झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी मिळणार अनुदान
By admin | Published: June 29, 2014 11:43 PM2014-06-29T23:43:09+5:302014-06-29T23:43:09+5:30
शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला
अमरावती : शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेता शासनाने मागील वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत किमान गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना मागील चार वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे. त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या अनेक गावे समृद्ध होऊन विकास कामांना निधी मिळणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत गटविकासमार्फत अर्ज पाठविले. यामध्ये राज्यातील चार हजारांवर ग्रामपंचायती लाभ घेण्यास पात्र ठरल्या आहेत. या योजनेंतर्गत निकष पूर्ण ग्रामपंचायतींना गावाच्या लोकसंख्येच्या आधारे विकास निधी देण्यात येतो. तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी यापूर्वी लावलेली झाडे दरवर्षी जिवंत ठेवल्यास त्यांना दरवर्षी निधी देण्यात येणार आहे.
शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा, तालुका ते स्थानिक स्तर पोहचविण्यापर्यंत शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च होतो. शासन अनेक योजना राबवीत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी शासनाच्या विविध उपक्रमात सक्रियतेने भाग घेणे महत्त्वाचे आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तंटामुक्ती यांसह अनेक योजनेत सहभाग घेतल्यास गावांचा विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. (प्रतिनिधी)