जंगलातील वन्यप्राण्यांसाठी गवताळ कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:32+5:302021-07-19T04:09:32+5:30
फोटो पी १८ पोहरा पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळात वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी गवताळ कुरण निर्माण केले आहे. २० ...
फोटो पी १८ पोहरा
पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळात वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी गवताळ कुरण निर्माण केले आहे.
२० हेक्टरचा व्याप, एक लाख थोंबे लागली, शिवारात शिरकाव थांबविण्यासाठी कुरण विकसित केले आहे. त्यात एक लाख थोंबाचे रोपण केले आहे. हा गवताळ जंगल पूर्णपणे विकसित झाल्यानंतर तृणभक्षी प्राणी याकडे आकर्षित होतील व गाव शिवारात त्यांचा शिरकाव थांबेल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.
अमरावती उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांच्या मार्गदर्शनात वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांनी पोहरा वर्तुळातील पोहरा बीट वनखंड क्रमांक ४० या बीट परिसरात जागेची पाहणी करून त्या ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी मुबलक चाऱ्याची सोय व्हावी, याकरिता ही उपाययोजना करण्यात आली. त्यानुसार पोहरा बिट वनरक्षक डी.ओ. चव्हाण यांनी अत्यंत नियोजनपूर्वक २० हेक्टर जंगल परिसरात विविध प्रजातींच्या तब्बल एक लाख थोंबांची लागवड करून घेतली. यामध्ये मारवेल, पवन्या, गोंडेल, नैसर्गिक हरळा या प्रजातींची थोंबे या परिसरात दोन मीटर रुंदी व एक मीटर लांबी अशा पद्धतीने लावण्यात आली. या थोंबांच्या योग्य संगोपनासोबतच वेळोवेळी निंदण करणे व अखाद्य गवताची कटर मशीनद्वारे कटाई नियोजनपूर्वक केली जात आहे. जंगलातील ही लागवड पूर्णपणे विकसित झाल्यानंतर वन्यप्राण्यांसाठी येत्या काळात जंगलातच मुबलक चारा उपलब्ध होईल. वन्यप्राण्यांनी हा चारा खाल्ल्यानंतर त्यांच्या विष्टेतूनदेखील या गवताची सर्वत्र जंगल परिसरात बीज प्रक्रिया होऊन कुरण विकास क्षेत्रासोबतच इतर जंगल क्षेत्रातही या गवताची उत्पत्ती होणार आहे. हे गवत नैसर्गिकरीत्या वाढत असून हिवाळा व पावसाळा या ऋतूत हिरवाकंच होतो, तर उन्हाळ्यात वाळलेला चारा वन्यप्राण्यांच्या उपयोगी पडतो. त्यामुळे ही उपाययोजना वन्यप्राण्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरणारी आहे. ही थोंबे उन्हाळ्यातदेखील जिवंत राहतात. हा चारा वन्यप्राण्यांसाठी वर्षानुवर्षे कायमस्वरूपी झाला. हे तर वन्यप्राण्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रक्रियेने इतर क्षेत्र या गवताने व्यापला जाऊ शकतो. हिरवळ आणि सौंदर्य जंगलाचे वैशिष्ट्य नाहीतर हा गवताळ भाग देखील जंगलाची संपत्ती म्हणता येईल. हे जंगल क्षेत्र कुरण विकासक्षेत्र म्हणून ओळखले जाईल.
बॉक्स
या वन्यप्राण्यांना चाऱ्याची सोय
या जंगलातील हरिण, चितळ, रानडुक्कर, रोही, भेडकी, नीलगाय, सांबर, भेकर, ससा हे वन्यप्राणी या चाऱ्याकडे आकर्षित होतील. त्या मागोमाग पाठलाग करीत बिबट्यांसाठी हे वन्यप्राणी खाद्य बनतील. त्यामुळे बिबटासह वन्यप्राण्यांना जंगलातच मुबलक खाद्य उपलब्ध होऊन त्यांचा जंगल परिसरातच मुक्त संचार वाढेल.
बॉक्स
शेती पिकाच्या नासाडीला काही प्रमाणात आवर
काही वर्षांपासून जंगलात वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने शेतातील पिकांच्या नुकसानीचे प्रमाणही वाढत चालले आहे. या अनुषंगाने ही उपाययोजना करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात शेती पिकांचा बचाव होईल. वन्यप्राणी शेतीकडे न वळता जंगलातच त्यांचे वास्तव्य राहील, हे विशेष.