उडवा ‘ग्रीन क्रॅकर्स’; अन्यथा लायसन्स निलंबित! पोलीस आयुक्तांनी घेतली विक्रेत्यांची बैठक

By प्रदीप भाकरे | Published: October 27, 2023 02:22 PM2023-10-27T14:22:01+5:302023-10-27T14:22:16+5:30

फटाके विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत व मानकांविरुध्द असलेले फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे.

Green Crackers issue Otherwise license suspended The police commissioner held a meeting of the vendors | उडवा ‘ग्रीन क्रॅकर्स’; अन्यथा लायसन्स निलंबित! पोलीस आयुक्तांनी घेतली विक्रेत्यांची बैठक

उडवा ‘ग्रीन क्रॅकर्स’; अन्यथा लायसन्स निलंबित! पोलीस आयुक्तांनी घेतली विक्रेत्यांची बैठक

अमरावती: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे फटाके विक्रेत्यांना केवळ कमी उत्सर्जन करणारे आणि ‘ग्रीन क्रॅकर्स’ फटाक्यांची विक्री करण्यास परवानगी आहे. जोडलेले फटाक्यांद्वारे मोठया प्रमाणात हवा, आवाज आणि घनकच-याची समस्या निर्माण होत असल्याने त्यांच्या वापरावर बंदी आहे. फटाके विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत व मानकांविरुध्द असलेले फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे.

१० ते १५ नोव्हेंबरदरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी गुरूवारी शहरातील फटाका असोशिएशनचे पदाधिकारी व घाऊक व किरकोळ फटाके विक्रेत्यांची बैठक घेतली. या बैठकीकरीता पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सागर पाटील तसेच, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, तसेच सर्व ठाणे प्रभारी व महानगरपालिका, ध्वनीप्रदुषण मंडळ, विज वितरण कंपनी, अग्निशमन विभाग यांचे प्रतिनिधी हजर होते. बैठकीदरम्यान विविध सुचना करण्यात आल्या.

परवानगी आवश्यक
परवानाधारक फटाका विक्रेते यांनी महानगरपालिका, विद्युत, अग्निशमन विभाग, ध्वनि प्रदुषण मंडळ, पोलीस विभाग यांचेकडून रितसर परवानगी घेवून नियोजित ठिकाणी फटाके विक्री करावी. विना परवाना फटाका विक्रेत्यांवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल. किरकोळ फटाके विक्रीकरीता लावण्यात येणा-या दुकानांमध्ये लाकडी साहित्य व कापडी पडदयांचा वापर करण्यात येवू नये. विक्रीकरीता ठेवण्यात येणारे फटाके सुरक्षित आणि ज्वलनशिल नसलेल्या सामग्रीच्या शेडमध्ये ठेवावे.

दुकानदारांनी पाळावेत नियम
फटाके विक्रीकरीता असलेल्या तात्पुरत्या दुकान परीसरात विजेच्या तारा लोंबकळत ठेवू नये. एकाच रांगेत असलेल्या दुकानांमध्ये विद्युत वाहीनीचा उपयोग करण्यात येत असेल तर त्याकरीता मास्टर स्विच लावण्यात यावा. फटाके विक्रीकरीता असलेल्या तात्पुरत्या दुकानांच्या ५० मीटरच्या परीसरात फटाके फोडण्यास मनाई राहील. शहराच्या कोणत्याही परीसरात एकाच जागेवर एकाच ठिकाणी ५० पेक्षा अधिक फटाके विक्री दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

अधिक आवाजाचे फटाके नकोत
फटाके विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत व मानकांविरुध्द असलेले फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. ऑन लाईन ई-कॉमर्स वेबसाईटवर फटाके खरेदी विक्रीवर पुर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. मर्यादीत ध्वनी पातळी असलेल्या फटाक्याच्या विक्रीलाच परवानगी. नागरीकानी ग्रीन लेबल असलेले फटाके खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Green Crackers issue Otherwise license suspended The police commissioner held a meeting of the vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.