हिरव्या मिरचीची बेभाव विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:32 PM2018-12-07T21:32:58+5:302018-12-07T21:33:48+5:30
तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरचीची रात्री भरणारी बाजारपेठ म्हणून राजुराबाजार प्रसिद्ध आहे. अलीकडच्या दहा वर्षांत नवीन वाणांमुळे मिरची अधिक तिखट आणि जादा उत्पादन देणारी ठरली आहे. मिरचीएवढी रोख रक्कम अन्य पिके देऊ शकत नसल्याने या पिकाकडे शेतकरी वळला आहे. आता एकरी २५ ते ४० क्विंटल तोडा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे किमान एकरभराचे क्षेत्र किमान पाच एकरावर गेले आहे. या अतिरिक्त मालाच्या तुलनेत राजुराबाजार येथील मिरचीची व्यापारी पेठ कमी पडत असल्याचे दिसून येते. एक किलो मिरची तोडून ती विकण्यासाठी १० रुपयांपर्यंत खर्च येतो. तथापि, बाजारात कधी क्विंटलला हजार, तर कधी ६०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे तोडण्याचा खर्चही निघत नाही. पुन्हा पीक घेण्यासाठी रासायनिक खताची मात्रा द्यावी लागते. त्यासाठी एकरी पाच हजारांचा खर्च येतो. क्विंटलमागे दोन हजारांवर मिरचीला किंमत आणि रेल्वेसारख्या वेगवान मालवाहतुकीची आवश्यकता व्यक्त होत आहे.
मिरचीचे तोडे थांबले
नवीन वाण अधिक तिखट असल्याने वापराला मर्यादा आहेत. त्यामुळे मागणी वाढण्याची वाट पाहत शेतकऱ्यानी मिरचीचे तोडे थांबवले आहेत. दरवर्षी जानेवारीनंतर मिरचीचे दर वाढत होते. मात्र, यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उलंगवाडी झाल्याने भाववाढीची अपेक्षा फोल ठरणार आहे.
रेल्वे लाईनची मागणी
मालवाहतुकीच्या साधनांची उपलब्धता पाहून व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतात. सध्या राजुराबाजार येथून रस्त्यानेच मालवाहतूक होऊ शकते. ती व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकºयांकडे मिरची साठल्याचे दिसून येते. अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाला जोडणारा रेल्वे मार्ग येथे मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मिरचीच्या नवनवीन वाणामुळे उत्पादन वाढले. त्यानुसार खर्चदेखील वाढला आहे. दोन ते अडीच हजारांपर्यंत भाव मिळाल्यास मिरची विकणे परवडणारे होऊ शकते. यासाठी सक्षम बाजारपेठ हवी आहे.
- गणेश गावंडे, शेतकरी, तळणी, ता. मोर्शी
प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणे गरजेचे आहे. कृषिमालासाठी शीतगृहाची निर्मिती शासनाने करावी.
- गोवर्धन दापूरकर, शेतकरी, अमडापूर, ता. वरूड