विदर्भातील संत्राबागांना ‘ग्रीनिंग‘ रोगाचा धोका; पानांवर पिवळे डाग, फळे कमजोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 11:54 AM2022-10-18T11:54:06+5:302022-10-18T11:55:11+5:30
झाडांमध्ये जिवाणूंचा शिरकाव
अमरावती : विदर्भातील संत्रा बागांमध्ये ग्रीनिंग (मंद ऱ्हास) रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. असंवर्धित जिवाणूची रोगवाहक सायट्रस सिला या किडीमुळे या रोगाचा प्रसार वाढता आहे. यात पानाच्या शिरा पिवळ्या होत असून फळे आकाराने लहान व असमतोल होत असल्याने उत्पादकांसमोर संकट उभे ठाकले आहे.
संत्रा बागांमध्ये पहिले अति तापमानामुळे व नंतर सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात गळ झालेली आहे. त्यानंतर आता ग्रीनिंगमुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे. विदर्भात या रोगाचा प्रसार वाढता आहे. यामुळे झाड कमजोर होऊन फांदी मर व ऱ्हास होत आहे. भारतात या रोगाची सन १९६० च्या दशकात प्रथम नोंद घेण्यात आली होती. ग्रीनिंगग्रस्त मातृवृक्षाचे डोळे कलम करताना वापरल्या गेल्यास याचा प्रसार होतो. याशिवाय बागेत सायट्रस सिला या किडीमुळे देखील होतो. झाडामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर संतुलित करणे महत्त्वाचे आहे
कीटकाद्वारा कोवळी पाने, नवती, कळ्या, फुले व कोवळ्या फांद्यातून रसाचे शोषण केले जात असल्याने फळांची गळ होते. यासाठी कृषी विभाग, कीटकशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
पश्चिम विदर्भात ८५ हजार मे.टन उत्पादन
विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार पश्चिम विदर्भात उत्पादनक्षम पाच हजार हेक्टरमध्ये ४५ हजार मे.टन व लिंबूवर्गीय साडेचार हजार हेक्टरमध्ये ८५ हजार मे. टन उत्पादन होते. या दोन्ही प्रकारात उत्पादनक्षम पाच हजार हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे.
संत्रा, मोसंबी व लिंबू पिकांमध्ये ग्रीनिंग रोगाचे प्रमाण वाढते आहे. यासाठी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. हा रोग सूक्ष्म जिवाणूंमुळे होतो. झाडामध्ये जिवाणूचा शिरकाव झाल्यानंतर झाड जिवंत असेपर्यंत जिवाणू सक्रिय राहतो.
डॉ. अनिल ठाकरे, कीटकशास्त्रज्ञ, डॉ. पं.दे.कृ. विद्यापीठ, अकोला