मानवमुक्तीच्या प्रणेत्या महामानवाला भावपूर्ण अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:21+5:302021-04-15T04:12:21+5:30
शहरातील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायांनी गर्दी केली होती. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून ...
शहरातील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायांनी गर्दी केली होती. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी नतमस्तक होत त्यांच्या लोकशाहीधिष्ठित विचारांचे बळ मिळविले. शहरातील विविध नगर-वस्त्यांमध्ये जयंतीनिमित्त उत्साहाचा माहौल सोमवारी रात्रीपासूनच तयार झाला होता. रात्री १२ वाजताच येथील इर्विन चौक, भीम टेकडी, शेगाव, रहाटगाव, तपोवन, बडनेराच्या नवीवस्तीतील अशोकनगर, पोलीस ठाण्यापुढील पुतळाजवळ फट्याकांची भव्य आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशाचा गजर, 'एकच साहेब - बाबासाहेब', ‘जोर से बोलो जयभीम’चा घोष आसमंतात निनादत होता.
बुधवारी इर्विन चौकात पुतळा परिसरात कोरोना नियमांचे पालन करीत आंबेडकरी अनुयायी जमले. यावेळी स्वयंशिस्त दिसून आली. इर्विन चौक गर्दीने फुलला होता. कोरोनामुळे यंदा आयोजनाचे स्वरूप भव्य नसले तरी छोटेखानी यात्रेचे स्वरूप या परिसराला आले होते. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा, फोटो, लॉकेट विक्रीसाठी काही स्टॉलवर सजले. काही संघटनांनी मिष्टान्न वाटप, शरबत, बुदी लाडूचे वाटप केले. शासकीय, प्रशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
-----------
अभाविपतर्फे रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिर फोटो - एबीव्हीपी १४ एस
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती महानगरचा दस्तुरनगर भाग व अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती यांच्यातर्फे रक्तदान शिबिरही पार पडले. महापौर चेतन गावंडे, अमरावती विभाग संघटनमंत्री अक्षय राजुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात ३० विद्यार्थिनींनी रक्तदान केले. शिबिराबद्दल अभाविप दस्तुरनगर भाग मंत्री श्रेयस देशमुख यांनी आभार मानले.