तंटे मिटणार, अर्धा तासात मोजणी, १९ रोव्हर मशीन उपलब्ध
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 25, 2023 05:13 PM2023-03-25T17:13:21+5:302023-03-25T17:30:27+5:30
भूमी अभिलेख विभाग झाला टेक्नोसॅव्ही, आता ‘घंटोका काम मिनिटों मे’
अमरावती : बांधावरून आपापसात होणारे तंटे यापुढे होणार नाहीत. याशिवाय जमीन मोजणीसाठी महिनोगणती वाट पाहण्याचीही गरज राहणार नाही. यासाठी भूमी अभिलेख विभाग टेक्नोसॅव्ही झाला आहे. ‘घंटोका काम मिनिटोमे’ अशा पद्धतीने जमिनीची मोजणी होणार आहे. या आठवड्यात १९ रोव्हर मशीन या विभागाला उपलब्ध झाल्या आहेत. याद्वारे एक हेक्टर जमिनीची मोजणी केवळ अर्धा तासात होणार आहे.
अचुकता आणि पारदर्शकता ही या मोजणीची खासियत राहणार आहे. याशिवाय वेळही वाचणार आहे. यापूर्वी १४ रोव्हर मशीन जिल्हा विकास निधीतून उपलब्ध झाल्या होत्या. या आठवड्यात भूमी अभिलेख विभागाद्वारा १९ रोव्हर जिल्ह्यास उपलब्ध झाले आहेत. यासंदर्भात सर्वांना प्रशिक्षित करण्यात येऊन लवकरच या कार्यप्रणालीद्वारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या फक्त अचलपूर तालुक्यात या मशीनद्वारे मोजणी होत आहे. लवकरच सर्व तालुक्यांत या पद्धतीने मोजणी केली जाणार असल्याचा विश्वास जिल्हा अधीक्षक स्मिता शाह यांनी व्यक्त केला.
पूर्वी टेबल किंवा ईटीएस मशीनच्या माध्यमाने जमिनीची मोजणी केली जायची. प्रत्येक २०० मीटरवर एक टेबल राहायचा, टेबल उचलून न्यावा लागत असे, झाडे, उंचसखल भागाचा अडथडा व्हायचा, यासाठी एक दिवस पार पडायचा. आता मात्र, रोव्हरद्वारे हेक्टरभर क्षेत्राची मोजणी तासाभरात होणार आहे.
कार्स प्रणालीमार्फत जीपीएसद्वारे अचूक व पारदर्शकरित्या जमिनीची मोजणी होत आहे. यामध्ये वेळ वाचेल व अक्षांश, रेखांश कायम राहतील, ते भविष्यात कायम पडेल. या आठवड्यात १९ रोव्हर मशीन उपलब्ध झाल्या आहेत.
- स्मिता शाह, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख