आईच्या विरहात कुशीतील पिल्लू व्याकुळ; समाजमनही हळहळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:05 AM2023-02-27T11:05:55+5:302023-02-27T11:09:24+5:30
भरधाव वाहनाने हिरावले तिचे प्राण
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : अज्ञात वाहनाच्या धडकेत आई ठार झाली. कुशीतील पिल्लूही जखमी झाले. नेमके काय झाले, हे कळायच्या स्थितीत नसलेल्या या पिल्लाने ओरडून ओरडून आईला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, रस्त्याने येणारे-जाणारे घटनास्थळी थांबू लागले. आईकरिता हृदय पिळून टाकणारा त्या पिल्लाचा आक्रोश बघून सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. यातच लगतचे गावकरीही घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी नवीन कपडे आणले. त्या नव्या कोऱ्या कपड्यात तिचे पार्थिव ठेवून त्याचे पूजन केले आणि लगतच्या शेतात अंत्यविधी करण्याचा सर्वांनी मिळून निर्णय घेतला.
दरम्यान, वन्यजीव असल्यामुळे याची माहिती वनविभागाला दिली. ती मृत आई आणि ते पिल्लू या दोघांनाही वनविभागाच्या दवाखान्यात पोहोचते केले. डॉक्टरांनी त्या आईला मृत घोषित केले आणि त्या पिल्लावर उपचार सुरू केले. ते पिल्लू वनविभागाच्या स्वाधीन केले गेले, तर त्या मृत आईच्या पार्थिवला अग्नी दिल्या गेल्या.
परतवाडा-अंजनगाव मार्गावर २४ फेब्रुवारीला सायंकाळी सावळी फाट्याजवळ एक माकडीण आपल्या तीन ते चार दिवस वयाच्या पिल्लाला सोबत घेऊन रस्ता ओलांडत होती. यादरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत ते मादी माकड घटनास्थळीच ठार झाले, तर ते निरागस पिल्लू जखमी झाले. याची माहिती मोनू इर्शीद, सनी यादव, शुभम गुप्ता यांना मिळाली. तेही घटनास्थळी दाखल झालेत. त्या जखमी पिल्लाला मायेने या सर्वांनी जवळ घेतले. त्या पिल्लाला शांत करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण, आईची माया आणि कुशीतील ऊब मिळावी म्हणून ते माकड अखेरच्या क्षणापर्यंत ओरडत, रडतच राहिले.