आरोग्यदायिनी आजाराच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:44+5:302021-09-22T04:15:44+5:30
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजावणाऱ्या आरोग्यदायिनींवर कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कामाचा बोजा ...
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजावणाऱ्या आरोग्यदायिनींवर कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कामाचा बोजा वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
जिल्ह्यात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर ३३६ उपकेंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये चारशेच्या अधिक आरोग्य सेविका बजावतात. दोन वर्षे कोरोना, तर सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असल्यामुळे या आरोग्य सेविका अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यांच्या दैनंदिन कामकाजांचा आढावा घेतला असता, वाढत्या धावपळीत स्वत:चे आरोग्य सांभाळणे कठीण झाले असल्याची बाब समोर आली आहे. मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले. अनेकींना व त्यांच्या कुटुंबीयांना आजाराने गाठले.
जबाबदारीत वाढ
गावात एखाद्या व्यक्तीला रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, असे आजार असल्यास रुग्णांना औषोधपचार करण्यासाठी शहराच्या दवाखान्यात नेण्याचे काम आरोग्य सेविकांना देण्यात आले. गावात दिवसभर राबराब रुग्णांची सेवा व सर्वेक्षण करताना व्हिलेज बॅरिस्टरचाही त्रास सहन करावा लागतो. उपकेंद्र बंद दिसले की, थेट जिल्हा पातळीवर करण्यात येते.
असामाजिक घटकांना आळा घाला
राष्ट्रीय ग्रामीण अभियान सन २००५ पासून सुरू झाले. उपकेंद्र बळकटीसाठी १० हजार व अबंधित निधी १० हजार असे २० हजार रुपये वर्षाकाठी मिळतात. सरपंच व आरोग्य सेविकेच्या नावाने हे खाते असले तरी आरोग्य उपकेंद्राऐवजी लोकप्रतिनिधी स्वमर्जीने या निधीचा विल्हेवाट लावतात व त्यानंतर बनावट बिल सादर करण्यासाठी आरोग्य सेविकांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याची अनेक उदाहरणे तालुक्यात आहेत. एकीकडे ग्रामपातळीवर आरोग्य सेविकांना काही असामाजिक घटक त्रास देण्याचे काम करतात. दुसरीकडे प्रशासनही सहकार्य करीत नसल्याची कैफियत काही आरोग्य सेविकांनी मांडली आहे़
स्वत:चे आरोग्य सांभाळावे कसे?
पावसाळ्यात आरोग्य सेविकांना अधिक सर्तक राहावे लागते. यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले. दररोज रक्त तपासणी करणे, प्रत्येक गावाचा दौरा करणे, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वत: चे आरोग्य सांभाळावे कसे, असा सवाल या आरोग्य सेविकांपुढे निर्माण झाला आहे.