पोलिसांच्या दादागिरीविरुद्ध किराणा व्यापारी पोहोचले आमदाराच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:40+5:302021-04-28T04:13:40+5:30
धारणी : शहरात २६ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी किराणा दुकानदारांना वाहनातून पोलीस ठाण्यात ...
धारणी : शहरात २६ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी किराणा दुकानदारांना वाहनातून पोलीस ठाण्यात आणले. यानंतर मानसिक त्रास दिल्याबद्दल मंगळवारी सकाळी ११ वाजता सर्व किराणा व्यवसायिक आमदार राजकुमार पटेल यांच्या निवासस्थानावर धडकले.
शनिवार आणि रविवारी बंद असल्याचे गृहीत धरल्याने बाहेर गावातील नागरिक शहरात खरेदी करण्याकरिता आले नाही. परंतु, सोमवारी सकाळपासून रस्त्यावर गर्दी झाली. त्यामुळे परिस्थिती आवाक्याबाहेर झाली. अशा परिस्थितीत कोणी तरी सोशल मीडियावर शहरातील गर्दी दाखविणारे छायाचित्र वायरल केल्यामुळे पोलिसांनी थेट कारवाई करण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता किराणा दुकानासमोर गर्दी पाहून दुकानदारांची कोणतीही चूक नसताना सात दुकानदारांना पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे जवळपास तीन-चार तास त्यांना बसवून त्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दलची तक्रार किराणा व्यवसायिकांनी आमदार राजकुमार पटेल यांच्यासमोर मांडले. पोलिसांनी अर्वाच्य शब्दांत दुकानदारांना शिवीगाळ केल्याचीसुद्धा नमूद आहे. आमदार राजकुमार पटेल यांनी त्यांची व्यथा जाणून घेऊन दुकानदारांसोबत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांच्याशी चर्चा करण्याकरिता गेले होते.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी किराणा दुकानदारांचे व्यथा जाणून घेतल्या आणि आणि यापुढे कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही, ही अशी ग्वाही दिली. मात्र, आपली दुकाने ११ वाजता बंद करण्याबाबत सूचनासुद्धा दिली.
किराणा दुकानदारांची विशेष मागणी अशी आहे की, सकाळी ११ वाजता दुकान बंद करीत असताना आपले सामान आत ठेवणे आणि हिशोब करण्याकरिता कमीत कमी दीड-दोन तास दुकानाचे शटर लावून हिशेब करण्याची संधी द्यावी आणि दुकानदारांचा ट्रकमध्ये येणारा माल गोदामात भरण्यासाठी संध्याकाळी दोन ते तीन तास सूट देण्यात यावी. या दरम्यान कोणत्याही प्रकारचे दुकानाचे माल विकणार नाही, अशी ग्वाही दिली. किराणा दुकानदारांची समस्या निकाली काढावी, असे निवेदन किराणा दुकानदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केले.