भूजलपातळीत १२ फुटांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:58 PM2018-02-10T22:58:07+5:302018-02-10T23:19:16+5:30
पावसाळ्यात सरासरीहून ३६ टक्के पाऊस कमी झाल्याचे परिणाम जाणवायला लागले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
गजानन मोहोड ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : पावसाळ्यात सरासरीहून ३६ टक्के पाऊस कमी झाल्याचे परिणाम जाणवायला लागले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. पाच वर्षांच्या तुलनेत यंदा दर्यापूर वगळता उर्वरित १३ तालुक्यांत जमिनीतील पाण्याची पातळी १२ फुटांपर्यंत (४ मीटर) खोल गेलेली आहे. अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात भूजलस्तर सर्वाधिक कमी झालेला आहे.
भूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८० गावांना मार्चपर्यंत तर एप्रिल ते जून या कालावधीत ११ तालुक्यांतील १२९ गावांत भीषण पाणीटंचाई राहणार आहे. जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे.
स्रोत संरक्षित करण्यावर भर
जिल्ह्यात सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. पावसाळ्यात सरासरी ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. लघुपाणलोट क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरीतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार या गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल यापूर्वीच भूजल विभागाने जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यातील गावे डोंगराळ भागात आहेत. येथे भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड व मोर्शी तालुक्याचा भाग अतिविकसित पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असल्याने व येथे बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे येथील उपशावर जिल्हा प्रशासनाद्वारा निर्बंध आणावे लागणार आहे.
पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस मनाई
वरूड व मोर्शी हे तालुके अतिविकसित पाणलोट क्षेत्र आहेत. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने, येथील भूजल उपशावर नियंत्रन ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील ८ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल यापूर्वीच जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आलेला आहे.
तालुकानिहाय पाणीपातळीतील घट
तिवसा, मोर्शी, धारणी, चिखलदरा, धामणगाव रेल्वे तालुक्यांमध्ये
० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी घटली आहे.
अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व वरूड तालुक्यात
१ ते ३ मीटरपर्यंत पाण्याच्या पातळीत कमी आली.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात २ ते ३ मीटरपर्यंत, तर चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यांमध्ये ३ ते ४ मीटरपर्यंत पातळी घटली आहे.
दर्यापूर तालुक्यात ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झालीे. खारपाणपट्टा असल्याने या भागात उपसा नाही.
जिल्ह्यात सरासरीच्या ३६ टक्के पाऊस कमी झाल्यानेच भूजल पातळी घटली. चांदूर बाजार, अचलपूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात भूजल स्तर खालवला आहे.
- विजय खरड
वरिष्ठ भूवैज्ञानिक
भूजल सर्वेक्षण विभाग