उपविधी दुरुस्तीमुळे बाजार समिती संचालकांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:02 PM2017-12-29T23:02:28+5:302017-12-29T23:02:46+5:30

Grounds on market committee directors due to repair by Subdivision | उपविधी दुरुस्तीमुळे बाजार समिती संचालकांवर गंडांतर

उपविधी दुरुस्तीमुळे बाजार समिती संचालकांवर गंडांतर

Next
ठळक मुद्देआता १८ संचालकांचे मंडळ : ग्रामपंचायत, सोसायटी मतदारसंघाची मक्तेदारी मोडीत

आॅनलाईन लोकमत
अमरावती : पणन विभागाने बाजार समित्यांच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करून दहा गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला. त्यामुळे आजवर प्रस्थापित असणाऱ्या ग्रामपंचायत व सोसायटी मतदारसंघाची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. बाजार समितीच्या उपविधी दुरुस्तीनंतर २१ सदस्यांऐवजी आता १८ सदस्यांचे संचालक मंडळ राहणार आहे. अध्यादेशानंतर निवडणुकीस पात्र बाजार समित्यांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचे निर्देश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
प्रचलित पद्धतीनुसार बाजार समितीमध्ये २१ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. यामध्ये विविध सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, प्रक्रिया मतदारसंघ, व्यापारी व हमाल मतदारसंघासह एकूण २१ संचालकांचा यामध्ये समावेश राहायचा. यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही स्थान नव्हते. राज्य शासनाने प्रथम अध्यादेश काढून बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मताधिकार दिला व या निवडणुकीतील प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली.
दहा आर शेतधारणा असलेल्या व पाच वर्षात किमान तीन वेळा शेतमाल बाजार समित्यांमध्ये शेतमाल विकलेल्या शेतकऱ्यांना अध्यादेशानुसार मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे किमान १५ शेतकरी संचालक बाजार समित्यांवर निवडले जाणार आहेत. याशिवाय अडते-व्यापारी यांचे दोन, हमाल व तोलाईदार यांचे दोन असे १८ सदस्यांचे संचालक मंडळ आता पुढच्या निवडणुकीपासून राहणार आहे. सध्या पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हा उपनिबंधक घेतात. त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतली जाते. मात्र, आता यापुढील निवडणूक राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
असे राहणार नवीन संचालक मंडळ
बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांचे १५ संचालक राहणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील १०, महिला प्रतिनिधी २, अनुसूचित जाती १, इतर मागास वर्ग १ व भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातील १ संचालक राहणार आहे. हमाल- तोलाईदार १, अडते-व्यापारी १ तसेच जिल्हा उपनिबंधक स्वीकृत १ असे १८ सदस्यांचे संचालक मंडळ राहणार आहे.
असे आहे प्रचलित संचालक मंडळ
सद्यस्थितीत सोसायटी मतदारसंघातील ११ पैकी सर्वसाधारण ७, महिला २, इतर मागासवर्गीय १, भटक्या-विमुक्त जाती १ तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ पैकी आर्थिक दुर्बल १, अनुसूचित जाती १, हमाल-तोलाईदार १, अडते-व्यापारी २, प्रक्रिया संस्था १, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी १, पंचायत समिती १ व जिल्हा उपनिबंधक १ असे संचालक मंडळ अस्तित्वात आहे.

Web Title: Grounds on market committee directors due to repair by Subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.