४५६ गावात भूजलात तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:01:01+5:30

यंदाच्या जून महिन्यात केवळ ७ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात थोडी परिस्थिती सुधारली. यात १४ दिवस पावसाची नोंद झाली. पावसाच्या सुरुवातीच्या ६० दिवसांत फक्त २१ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुबार पेरणीसह पिके जगविण्यासाठी भूजलाचा वारेमाप उपसा झाला.

Groundwater deficit in 456 villages | ४५६ गावात भूजलात तूट

४५६ गावात भूजलात तूट

Next
ठळक मुद्देधक्कादायक : उशिरा पाऊस, अमर्याद उपसा, भूजल पुनर्भरणाला फटका

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली असली तरी सुरुवातीचे दोन महिन्यांतील खंड, त्यामुळे झालेला अमर्याद पाणी उपसा, त्यानंतर होत असलेले भूजल पुनर्भरणामुळे १३ तालुक्यांतील ४५६ गावांमधील भूजलात १ ते १० फुटांपर्यंत तूट आल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे. मात्र, सप्टेंबरनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्याला दिलासा मिळाला. त्यामुळे पावसाच्या सरासरीत ३० टक्क्यांनी माघारलेला भातकुली तालुका वगळता जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई राहणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या जून महिन्यात केवळ ७ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात थोडी परिस्थिती सुधारली. यात १४ दिवस पावसाची नोंद झाली. पावसाच्या सुरुवातीच्या ६० दिवसांत फक्त २१ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुबार पेरणीसह पिके जगविण्यासाठी भूजलाचा वारेमाप उपसा झाला. त्याचा थेट परिणाम होऊन जिल्ह्याच्या भूजलात कमालीची तूट आली. आॅगस्ट महिन्याच्या अखेरपासून पुन्हा पावसाने जोर पकडला, तो सप्टेंबर अखेरपर्यंत कायम राहिला. त्यामुळे आॅगस्टमध्ये १२ दिवस, तर सप्टेंबर महिन्यात पावसाचे १६ दिवसे राहिलेत. सप्टेंबर महिन्न्यात सरासरीच्या ११४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी १०९.२ झाली. फक्त आठ तालुक्यांनीच पावसाची सरासरी पार केलेली आहे. यामध्ये सर्वात कमी ७० टक्के भातकुली, अमरावती ९७ टक्के, नांदगाव खंडेश्वर ९६.९, तिवसा ९०.६, व वरूड तालुक्यात ८७ टक्के हे तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.
पावसाळा संपल्यानंतर भूजल सर्वेक्षण यंत्रणेद्वारा जिल्ह्यातील नियमित निरीक्षणाच्या १५० व नव्याने स्थापित केलेल्या ९७९ अशा एकुूण ११२९ विहिरींच्या पाणी पातळीच्या नोंदी घेण्यात आल्यात. त्याची जिल्ह्यातील पर्जन्यमान व मागील पाच वर्षांतील पाणी पातळीशी तुलनात्मक अभ्यासाअंती भूजल सर्वेक्षण विभागाने अहवाल तयार केला. यामध्ये जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुका वगळता अन्य १३ तालुक्यांतील ४५६ गावांमधील भूजलात १ ते १० फुटांपर्यंत कमी आलेली असल्याचे निरीक्षण नोंदविले. जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्के पावसाची सरासरी कमी आलेल्या भातकुलीत मात्र, यंदा पाणीटंचाईचे चटके जाणवणार आहे. याविषयीचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा शासनाला पाठविण्यात आला आहे. संबंधित विभागाने वेळीच नोंद घेतल्यास भातकुली तालुक्यातील पाणीटंचाई सावरू शकणार आहे.

३१७ गावांमध्ये तीन मीटरपर्यंत कमी
जिल्ह्यातील ३१७ गावांमध्ये सद्यस्थितीत ३ मीटरपर्यंत भूजलात तूट आलेली आहे. २ ते ३ मीटरपर्यंत ३९ गावांमध्ये व १ ते २ मीटरपर्यंत १०० गावांमध्ये असे एकूण ४५६ गावांमध्ये भूजलात तूट आल्याचे ‘जीएसडीए’चे निरीक्षण आहे. अमरावती व अकोला जिल्ह्यात असलेल्या गाळाचा प्रदेशात प्रामुख्याने ही तूट आलेली आहे. मात्र, पावसाळा पश्चातही झालेल्या पावसाने भूजल पुनर्भरण होत असल्याने जानेवारी महिन्यातील भूजलाच्या नोंदीमध्ये बराच फरक राहणार असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक उल्हास बंड यांनी दिली.

चांदूर बाजारला सर्वाधिक तूट, धामणगाव सेफझोनमध्ये
यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक म्हणजेच सरासरीच्या १५५ टक्के अधिक पाऊस चांदूर बाजार तालुक्यात झालेला आहे. मात्र, या तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक उपसा झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात पुनर्भरण झालेले नाही. या तालुक्यातील १५२ गावांमध्ये भूजलात १ मीटरपेक्षा तूट आलेली आहे. त्या तुलनेत अचलपूर तालुक्याने बऱ्याच प्रमाणात तूट भरून काढलेली आहे. या तालुक्यात ३९ गावांमध्ये तूट आहे. अमरावती १६, अंजनगाव सुर्जी ११३, भातकुली ३९, चांदूर रेल्वे ३, चिखलदरा २६, दर्यापूर ३२, धारणी ६, मोर्शी १०, नांदगाव ४, तिवसा ३ व वरुड तालुक्यात १३ गावांमध्ये तूट आहे.

भातकुली तालुक्यातील
३९ गावांत 'अलर्ट'

जिल्ह्यात भातकुली तालुक्यात सरासरीच्या ३० टक्केच पाऊस पडला. त्यामुळे १६ गावांत २ ते ३ मीटरपर्यंत व २३ गावांत १ ते २ मीटरपर्यंत भूजलात तूट आलेली आहे. यामध्ये अफजलपूर, आंचलवाडी, हिम्मतपूर, खारतळेगाव, मार्कंडाबाद, नारायणपूर, निरुळ गंगामाई, पोहरा, रासेगाव, रामा, रुस्तमपूर, संभेगाव, साऊर, थूगाव, उमरटेक, वाठोंडा, आबिदपूर, अळणगाव, बडेगाव, बोकूरखेडा, चांदपूर, दागदाबाद, ढंगारखेडा, हातखेडा, इस्मालपूर, कळमगव्हाण, खोलापूर, मक्रमपूर, मालपूर, मार्की, राईपूर, रसूलपूर, तुळजापूर, उमरपूर आदी गावांचा समावेश आहे.

Web Title: Groundwater deficit in 456 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी