भूजल पातळीत दीड मीटरने तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:30 PM2018-04-18T22:30:15+5:302018-04-18T22:30:50+5:30
गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.
जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट प्रकारच्या कठीण पाषाणाचा आहे व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा सरासरी ३४ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजलाचे अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. उर्वरित पाणवहन क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.
भूजलात सर्वाधिक कमी असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे.
अतिविकशित पाणलोट क्षेत्रात बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या भागातील भूजल साठा झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल असल्याची माहिती आहे.
आता १,१३४ विहिरींद्वारे भूजलाची नोंद
जिल्ह्यात भूशास्त्रीय परिस्थितीनुरूप १,१३४ विहीरी प्रस्थापीत करण्यात आल्यात.जलस्वराज प्रकल्पातंर्गत आता जलसुलक्षक व ग्रामसेवकांवर विहिरींची नोंद घेण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. दर महिण्याला या विहिरींच्या भुजलाची नोंद ठेवल्या जाणार असल्याने भूजल मूल्यांकन त्वरेने होण्यास मदत होणार आहे. यामध्ये नोंदीसाठी मोबाईल इंटरनेटचा वापर होईल.
भूजल घटनिहाय तालुका स्थिती
जिल्ह्यात मार्चअखेर भूजल पातळीत सरासरी १.५० मीटरने कमी आली. यामध्ये सहा तालुक्यात ० ते एक मीटरपर्यत, पाच तालुक्यात एक ते दोन मीटरपर्यत, दोन तालुक्यात दोन ते तीन मीटरपर्यत तर एक तालुक्यात तीन मीटरपेक्षाअधिक भूजलात कमी आलेली आहे.