पाच वर्षांत पहिल्यांदा भूजलस्तरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:54+5:302021-04-09T04:12:54+5:30
गजानन मोहोड अमरावती : पाच वर्षांत प्रथमच जिल्ह्याच्या भूजल स्थितीत सुधार आलेला आहे. १० तालुक्यांत पावसाने सरासरी पार केल्याने ...
गजानन मोहोड
अमरावती : पाच वर्षांत प्रथमच जिल्ह्याच्या भूजल स्थितीत सुधार आलेला आहे. १० तालुक्यांत पावसाने सरासरी पार केल्याने हा दिलासा मिळाला. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा या आठवड्यात १४ ही तालुक्यांतील १५० निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीच्या आधारे हे निरीक्षण नोंदविले. यात जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.१० मीटरने वाढ झालेली आहे. नऊ तालुक्यांत ही वाढ नोंदविण्यात आली. याशिवाय चार तालुक्यांत जेमतेम स्थिती व एकमात्र अंजनगाव सुर्जी तालुक्यात ०.१९ मीटरने तूट आलेली आहे.
जिल्ह्यात डिसेंबरअखेर ८७९ मिमी पावसाची नोंद झाली. ही ९५ टक्केवारी आहे. गतवर्षी १२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली व या महिन्यात पावसाचे १७ दिवस राहिलेत. सरासरीच्या १३१ टक्के पावसाची नोंद या महिन्यात झाली. जुलै महिन्यात पावसाचे २३ दिवस व सरासरीच्या ९८ टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात पावसाचे १८ दिवस पाऊस पडला व सरासरीच्या ७७ टक्के नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात सात दिवस पावसाचे राहिले व सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडला. त्यानंतर परतीच्या पावसाने पिच्छा सोडला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूजल पुनर्भरण झाले व त्यामुळेच जिल्ह्याच्या भूजलस्थितीत सुधार आलेला आहे.
जमिनीत आर्द्रता असल्याने रबीच्या हरभऱ्यासाठी सुरुवातीच्या काळात पाण्याचा उपसा झालेला नाही. याशिवाय प्रकल्प व जलाशयात देखील पाण्याचा मुबलक साठा असल्याने रबीसाठी पाण्याच्या पाळ्या सोडण्यात आलेल्या आहे. त्यामुळे भूजलाचा उपसा आतापर्यंत मर्यादित स्वरुपात झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी वाढ होऊन जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
मोर्शी, नांदगाव, धारणी तालुक्यात सर्वाधिक वाढ
मार्चअखेर अमरावती तालुक्यात ०.१९ मीटर, भातकुली ०.९७ मीटर, नांदगाव खंडेश्वर २.१५ मीटर, चांदूर रेल्वे १.१६ मीटर, तिवसा ०.१५ मीटर, मोर्शी २.३९ मीटर, वरूड १.७७ मीटर, अचलपूर १.१२ मीटर, चांदूर बाजार १.४० मीटर, दर्यापूर ०.७१ मीटर, धारणी २.५३ मीटर, चिखलदरा १.२२ मीटर व धामणगाव तालुक्यात १.५५ मीटरने भूजलात वाढ झालेली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ०.१९ मीटरने तूट आलेली आहे.
बॉक्स
अमरावती महापालिका क्षेत्रात जेमतेम स्थिती
अंंमरावती महापालिका क्षेत्रात मार्चअखेर भूजलस्थिती ६ मीटरपर्यंत आलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.१९ मीटरने वाढ झालेली आहे. मात्र, शहरातील ३,५०० हातपंप व २२ हजारांवर बोअरद्वारे सातत्याने उपसा होत आहे. रस्ते कामांसाठी दुभाजकांवरही बोअर करण्यात आलेले आहे. शहरात सर्वत्र कॉंक्रीटचे रस्ते होत असल्याने भूजलाच्या उपशाचे तुलनेत पुनर्भरण होत नसल्याची आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.
बॉक्स
अंजनगाव, अमरावती, तिवसा तालुक्यासाठी धोक्याची घंटा
जिल्ह्यात सद्यस्थितीत अंजनगाव सुर्जी या तालुक्यात सरासरीपेक्षा ०.१९ मीटरने तूट आलेली आहे. याशिवाय अमरावती तालुका ०.१९ मीटर व तिवसा तालुक्यात ०,१५ मीटर भूजलात वाढ झालेली असली तरी मार्चपश्चात या तालुक्यांमध्ये मोठी तूट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तालुक्यात भूजल भरणासाठी कार्यक्रम राबविणे महत्त्वाचे आहे.
पाईंटर
निरीक्षण विहीरींची संख्या : १५०
पाच वर्षांतील भूजलस्थिती : ७.५४ मी.
मार्च २०२१ अखेरस्थिती : ६.४४ मी.
भूजल पातळीची जिल्हास्थिती : १.१० मी
भूजलात वाढ झालेले तालुके : १३
भूजलात घट आलेले तालुके : ०१