तळणी येथे भीषण पाणीटंचाई
By admin | Published: February 14, 2016 12:25 AM2016-02-14T00:25:54+5:302016-02-14T00:25:54+5:30
पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
भटकंती : उन्हाळ्यापूर्वीच पेटला गावात पाणीप्रश्न
मोर्शी : पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीने तात्पुरती व्यवस्था केलेली विहीर आटली असून मागील १० दिवसांपासून गावातील नळयोजना बंद आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शेतातून टाकावी लागत असून उभ्या पिकांमुळे महिनाभरापासून काम प्रलंबित आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात पाणी टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार असल्याचे समजते. मागील वर्षी नव्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पावसाळ्यानंतर सदर योजनेचे काम होऊ शकले नव्हते. मागील वर्षीही तीव्र पाणी टंचाईचा सामना तळणीकरांना करावा लागला. प्रशासकीय मंजुरातीचे अनेक अडथळे पार केल्यानंतर योजनेचे काम जेमतेम सुरू झाले होते.
पाण्याचे महत्त्व समजून तातडीने मंजुरात मिळणे गरजेचे होते. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला नसता.
गावाला नवीन योजनेचे पाणी सुरू होईपर्यंत नव्या विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव शासन दरबारात ग्रामपंचायतने सादर केला असून प्रस्ताव मंजूर होईपर्यंत नागरिकांची शेतातून पाणी आणण्यासाठी पायपिट सुरुच राहणार आहे. शेतीची मजुरीची कामे सोडून पाणी आणण्याचे काम नागरिक सध्या करत असून गावातील विहीरींचे, हातपंपाचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)