जियाउल्लाच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:51+5:30
निवासी मदरशात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नागपुरी गेट पोलिसांनी संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. बुधवारी त्याला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत्र न्यायाधीश ए.व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मदरशातील मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोपी मुफ्ती जियाउल्ला खान याला न्यायालयाने आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील सहआरोपी फिरदौस नामक महिला पसार असून, तिच्या शोधात नागपुरी गेटचे पोलीस पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे.
निवासी मदरशात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नागपुरी गेट पोलिसांनी संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. बुधवारी त्याला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत्र न्यायाधीश ए.व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडीदरम्यान पोलिसांनी त्याचे बयाण नोंदविले. त्याला मदरशातील घटनास्थळी नेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आली. सहआरोपी फिरदौसबाबत विचारणा करून तिच्या घराचा पत्ता पोलिसांनी मिळविला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लभाने यांच्यासह पोलीस हवालदार प्रमोद गुडदे, विलास पोहोणकर, विक्रम देशमुख यांचे पोलीस पथक फिरदौसच्या अचलपूर येथील घरी पोहोचले होते. मात्र, ती मिळाली नाही. ती मध्यप्रदेशात गेल्याच्या माहितीवरून पोलीस पथक तेथे रवाना झाले. फिरदौसच्या भावालाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी मदरशातील सर्व मुलींचे, त्यांच्या आई-वडिलांचे मोबाइल क्रमांक मिळविले असून, त्यानुसार स्थानिक मुलींशी व त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क करून बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, जियाउल्ला खानची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने जियाउल्ला खानच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा खटला
पीडितेला न्याय व संरक्षणासाठी मुस्लिम बांधव एकवटले आहेत. शुक्रवारी मुस्लिम समाज न्यायप्रिय घटकमार्फत मोहम्मद अलीम पटेल, अन्सार बेग, रियाज पटेल, सैय्यद ऐजाज, मोहसिन खान, मोबीन खान, जावेद अहेमद खान, जुनेद खान यांच्यासह आदी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रकरणाची सखोल चौकशी करा, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा, मुलीला व तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्या, आरोपीसह सहआरोपींची नार्को टेस्ट करा, पीडितेस २५ लाखांची आर्थिक मदत करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संस्था पदाधिकाऱ्यांत पत्नीचा सहभाग
जियाउल्ला खान अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. या घटनाक्रमामुळे जियाउल्ला खानची पत्नीदेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.
धर्मादाय आयुक्त, 'सीए'ला पत्र
जियाउल्ला खान निवासी मदरसा व जोया एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे. ती संस्था कायदेशीर मान्यताप्राप्त आहे का, याच्या पडताळणीसाठी पोलीस धर्मादाय आयुक्तांना पत्र देणार आहेत, शिवाय संस्थेचा आॅडिट रिपोर्टसाठी त्याच्या सीएला पत्र देतील.
एका साक्षीदाराचे न्यायालयासमक्ष बयाण
पीडित मुलगी व एका साक्षीदार मुलीचे कलम १६४ अन्वये न्यायालयात शुक्रवारी बयाण नोंदविले जाणार होते. मात्र, पीडित सद्यस्थितीत बयाण देण्यास असमर्थ असल्यामुळे तिचे बयाण पुढील दिवसांत नोंदविले जाणार आहे. तथापि, साक्षीदार मुलीचे बयाण न्यायालयासमक्ष नोंदविण्यात आले.
न्यायालय परिसरात विरोधकांची गर्दी
आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने मुस्लिम बांधवांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या धक्कादायक व गंभीर घटनेमुळे पोलिसांनीही सतर्कता बाळगली आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुस्लिम बांधव सरसावले आहेत. शुक्रवारी नागरिकांची न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती.
मोबाइलसह संगणक दस्तावेज जप्त
पोलिसांनी गुरुवारी रात्री जियाउल्ला खानची चौकशी करून मोबाइल जप्त केला. मोबाइलचा सीडीआर काढून त्याने कुणाकुणाशी संपर्क साधला, कुणाला संदेश पाठविले, याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी मदरशातून कर्मचारी व मुलींचा हजेरीपट, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, हार्ड डिस्क, संगणक जप्त केला आहे.
मुलींचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध
आरोपी जियाउल्ला खानच्या समर्थकांनी मदरशातील मुलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ते व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या चार जणांची नावे पुढे आली असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांनाही सहआरोपी बनविले जाण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.