देवगाव शेतशिवारात रखवालदाराची हत्या; आरोपी शेतमजूर दाम्पत्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: November 5, 2023 06:46 PM2023-11-05T18:46:33+5:302023-11-05T18:46:51+5:30
देवगाव शिवारातील शेतात रखवालदार म्हणून काम करीत असलेल्या एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
अमरावती : देवगाव शिवारातील शेतात रखवालदार म्हणून काम करीत असलेल्या एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटना उजेडात आल्यानंतर केवळ २४ तासांत मारेकरी शेतमजूर दाम्पत्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूर्तिजापूर येथून अटक केली. राजू नारायण येयणे (५२) रा. देवगाव असे मृतकाचे नाव आहे. तर दिलीप उर्फ दीपक गुलाब पटेल (३९) रा. सावंगी, औरंगाबाद व कपुरा जयराम उईके (४०) रा. केशरपूर, चिखलदरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू येयणे हे देवगाव शिवारातील एका शेतात रखवालदार म्हणून काम करीत होते. या शेतात काही दिवसांपूर्वीच दिलीप पटेल व कपुरा उईके हे दोघे शेतमजूर म्हणून कामाला आले होते. तिघेही शेतातच वास्तव्यास होते. दरम्यान, राजू येयणे याची कपुरा उईके हिच्यावर वाईट नजर होती. ही बाब दिलीप पटेल याच्या लक्षात आली. या कारणावरून शनिवारी रात्री दिलीप पटेल व राजू येयणे यांच्यात वाद झाला. या वादात दिलीप पटेल व कपुरा उईके या दोघांनी राजू येयणे याची दगडाने ठेचून हत्या केली.
त्यानंतर दोघांनाही तेथून पळ काढला. ही बाब शेतमालकाच्या लक्षात आल्यावर तातडीने घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी गजानन महादेव येवले रा. देवगाव यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात दिलीप पटेल व कपुरा उईके हे दोघे मूर्तिजापूर येथे पळून गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथक मुर्तिजापूरला रवाना झाले. पथकाने मूर्तिजापूर येथील रेल्वे स्थानकामागील शेतातील एका झोपडीत लपून बसलेल्या दिलीप पटेल व कपुरा उईके यांना ताब्यात घेऊन अमरावतीत आणले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. राजू येयणे याची कपुरा उईके हिच्यावर वाईट नजर होती. या कारणावरून दिलीप पटेल व राजू येयणे यांच्यात वाद झाला. या वादात दिलीप पटेल व कपुरा उईके या दोघांनी राजू येयणे याची हत्या केली, असे चौकशीत समोर आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी परतवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, अंजली आरके, मंगेश मानमोडे, सागर धापड यांनी केली.