पालकमंत्र्यांनी सुनावले, पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:52+5:302021-02-10T04:13:52+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपायांची दक्षता घेतली जात नाही. प्रशासनाचा धाक उरलेला नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई ...
अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपायांची दक्षता घेतली जात नाही. प्रशासनाचा धाक उरलेला नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा. पुन्हा लाॅकडाऊनची वेळ येऊ देऊ नका, अशा शब्दांत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेत संबंधित सर्व विभागांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, यावेळी आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, पीडीएमसी अधिष्ठाता ए. टी. देशमुख, आयएमएचे अध्यक्ष अनिल रोहणकर यावेळी उपस्थित होते.
लस आल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर आल्याचे वाटत असतानाच या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. साथ अधिक वाढली आहे. पुन्हा लॉकडाऊनची वेळ येता कामा नये. तसे झाले तर यापूर्वीच निर्माण झालेल्या अडचणींत आणखी भर पडेल. युरोपियन देशांतील साथीच्या घटनांची पुनरावृत्ती आपल्याकडे घडता कामा नये. त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स पाळणे व हातांची स्वच्छता ही दक्षता सर्वांनी घेतलीच पाहिजे. स्वत: दक्षता न घेता इतरांचा जीव धोक्यात घालणे घातक आहे. कुणाला साथीचे गांभीर्य कळत नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. याबाबत शिस्त निर्माण करण्यासाठी सलग व सर्वदूर दंडात्मक कारवाई व जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांतून औषध साठा, उपचार सुविधा, आवश्यकतेनुसार खाटा आदी यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
बॉक्स
- तर रुग्णांकडून दंड वसुली
गृह विलगीकरणातील रुग्णांकडून लक्षणे नसल्यास बऱ्याचदा सोशल डिस्टन्स व इतर नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांकडून नियमभंग झाल्यास दंडाच्या सुस्पष्ट उल्लेखासह बाँड लिहून घेण्यात येईल. तसे झाल्याचे आढळताच मोठा दंड वसूल केला जाणार आहे. ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात बाधित आढळत आहेत, अशी ठिकाणे निश्चित करून तेथे रॅपिड अँटिजन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.