पालकमंत्र्यांनी काढला उपअभियंत्याचा कारभार
By Admin | Published: March 29, 2015 12:39 AM2015-03-29T00:39:47+5:302015-03-29T00:39:47+5:30
स्थानिक राधानगरस्थित सिटी सेंटर संकुलातील अतिक्रमण काढताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाचा उल्लेख महापालिका कर्मचाऱ्यांनी केल्याप्रकरणी शुक्रवारी ...
अमरावती : स्थानिक राधानगरस्थित सिटी सेंटर संकुलातील अतिक्रमण काढताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाचा उल्लेख महापालिका कर्मचाऱ्यांनी केल्याप्रकरणी शुक्रवारी उपअभियंत्याचा १० मिनिटांत कारभार काढण्यात आला. या कारवाईने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील संकुल, प्रतिष्ठाने, हॉटेल्स, मंगल कार्यालये आदी समोरुन वाहनतळ गायब झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने वाहनतळ शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारी सहायक संचालक नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. राधानगर येथील सिटी सेंटर संकुलातील वाहनतळ शोधमोहीम घेतली असता काही भागात अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले. परिणामी हे बांधकाम पाडण्यात आले. परंतु सिटी सेंटर संकुलाच्या संचालकांनी थेट पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याशी संपर्क साधला. महापालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण पाडताना पालकमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला, असे नामदार पोटे यांना भ्रमणध्वनीवरुन कळविण्यात आले. ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या जिव्हारी लागली. पोटे यांनी थेट आयुक्त अरुण डोंगरे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्याशी संपर्क साधून दीपक खडेकर कोण आहेत? अशी विचारणा केली. खडेकार यांच्याकडे असलेला अतिक्रमणाचा कारभार त्वरित काढून तसे आदेश दहा मिनिटांच्या आत निर्गमित करावे, असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. त्यानुसार प्रशासनाने शुक्रवारी उपअभियंता दीपक खडेकार यांच्याकडे असलेला कारभार काढला. त्यानंतर कल्पतरु मार्केट, रघुनंदन मार्केट येथील पार्किंगवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
पालकमंत्र्यांसमोर पेशी
अतिक्रमण काढताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा उल्लेख केल्याप्रकरणी कारवाईत सहभागी असलेल्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पेशी झाली. यावेळी बांधकाम व्यवसायाशी निगडित व्यावसायिक उपस्थित होते. ना. प्रवीण पोटे यांनी चुकीचे काम करताना माझ्या नावाचा उल्लेख करण्याची गरज नाही. अतिक्रमण काढताना संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन अवगत करणे आवश्यक आहे. परंतु थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आल्याची बाब पालकमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. एवढेच नव्हे, तर बांधकाम व्यावसायिकांना नियमबाह्य पद्धतीने कोणतेही काम करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी शहर अभियंता ज्ञानेद्र मेश्राम, सुहास चव्हाण, दीपक खडेकार, अजय विंचुरकर, गणेश कुत्तरमारे आदी उपस्थित होते.