पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 05:00 AM2021-09-12T05:00:00+5:302021-09-12T05:01:01+5:30
शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. ९२ हेक्टर शेतजमीन खरडून निघाली. बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील ४० हेक्टर वरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अतिवृष्टीने नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यात केलेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी केली. नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
माजी आमदार वीरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी यावेळी उपस्थित होते.
बेंबळा नदीच्या पुराने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे ५,५९५ हेक्टर शेतात पाणी शिरले, असा प्राथमिक अहवाल आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम भुसारी यांनी माहिती दिली.
शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. ९२ हेक्टर शेतजमीन खरडून निघाली. बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील ४० हेक्टर वरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड, कवठा कडू, दिघी या गावातील काही भागांची पाहणी करताना पूरपरिस्थितीत संरक्षक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. १६ गावातील ३५० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. तहसीलदार राजेंद्र इंगळे, पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, पळसखेडच्या सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसड आदी उपस्थित होते.