मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी गनिमी कावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:02 PM2018-07-21T23:02:28+5:302018-07-21T23:03:42+5:30
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठीचा पाठपुरावा व परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शेकडो जनांनी शनिवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शासननिषेधाच्या घोषणा देत मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठीचा पाठपुरावा व परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शेकडो जनांनी शनिवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शासननिषेधाच्या घोषणा देत मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
परळी येथे मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी २५ हजारांवर मराठा बांधव चार दिवसांपासून उपोषण करीत आहेत. त्यांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्वारस्य दाखवित नाहीत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा अमरावतीच्यावतीने परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार मराठा मावळे गनिमी काव्याने पंढरपुरात दाखल होतील व त्यांना मज्जाव करतील. यावेळी निर्माण होणाºया प्रसंगाला मुख्यमंत्रीच जबाबदार राहतील, असे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शासनाला ठणकावून सांगितले.
सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास मराठा क्रांती मोर्चा अमरावतीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी आणि वेळीच योग्य कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठाजन उपस्थित होते.