मेळघाटातील गाईड करतील पर्यटकांना मार्गदर्शन !

By Admin | Published: January 12, 2016 12:19 AM2016-01-12T00:19:58+5:302016-01-12T00:19:58+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे मार्गदर्शक (गाईड) यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Guide to tourists in Melghat will guide! | मेळघाटातील गाईड करतील पर्यटकांना मार्गदर्शन !

मेळघाटातील गाईड करतील पर्यटकांना मार्गदर्शन !

googlenewsNext

निवासी प्रशिक्षण वर्ग : वन्यजीव विभागाच्या ५२ गाईड्सचा सहभाग
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे मार्गदर्शक (गाईड) यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ५ ते १० जानेवारी दरम्यान पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या हरिसाल येथील संकुलात हा निवासी प्रशिक्षण वर्ग पार पडला. या प्रशिक्षणवर्गाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग व अकोट वन्यजीव विभाग अशा तीनही विभागांचे एकूण ५२ गाईड उपस्थित होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी, गुगामलचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे, सिपनाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा, अकोटचे उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान बीएनएचएसचे सहायक संचालक संजय करकरे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संपूर्ण प्राण्यांची ओळख करून दिली. संपूर्ण अन्नसाखळीत वाघाचे महत्त्व आपल्या ओघवत्या शैलीत पटवून दिले. सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष वाघाच्या अधिवासात संपूर्ण जैवविविधतेची माहिती दिली. यादरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रानपिंगळा हा दुर्मिळ पक्षीदेखील आढळला. तिसऱ्या दिवशी स्वप्निल सोनोने यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील औषधी वनस्पती व वाघाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. सहायक वनसंरक्षक शांतनिक भागवत यांनी 'मेळघाटातील पक्षी' या विषयावर सादरीकरण केले.
वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थींना अकोट वन्यजीव विभागातील नरनाळा अभयारण्य तसेच पुनर्वसन झालेल्या क्षेत्रात वनभ्रमंती केली. सकाळच्या सत्रात फुलपाखरे व कोळी निरीक्षण करण्यात आले. जोकर, नवाब, लिंबाळी, हबशी, शेंदऱ्या, चिमी, टायगर यांसह २५ प्रकारची फुलपाखरे दिसून आलीत. पदभ्रमण करताना ज्यायंट वूड स्पायडर, जंपिंग स्पायडर, टनेल वेब स्पायडरसारखे कोळी यांचीही माहिती देण्यात आली. जंगल सफारीदरम्यान सांबर, गवा, चितळ या प्राण्यांचे तर सर्पगरुड, घोंगी खंड्या, छोटा नीळा खंड्या, वेडा राघू, नीलकंठ, धनेश, सोनपाठी सुतार, सूर्यपक्षी, चष्मेवाला, रामगंगा, शिंपी, सातभाई, नाचन, गप्पीदास, दयाळ, खाटिक, बुलबुल या पक्ष्यांच्या दर्शनाने गाईड सुखावले.
शेवटच्या दिवशी सर्व गाईड प्रशिक्षणार्थींची लेखी चाचणी घेण्यात आली. संपूर्ण प्रशिक्षणात गाईड यांना जंगलात पर्यटकांना फिरवताना घ्यावयाची काळजी, शिस्त यावर अधिक भर देण्यात आला.
प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात सिपनाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक अमलेंदू पाठक, सहायक वनसंरक्षक यशवंत बहाळे व वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांचे हस्ते मार्गदर्शकांना प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच भारतातील पक्षी व भारतीय प्राणी हे पुस्तक बक्षीस देण्यात आले. आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांनी केले. कार्यक्रमासाठी पाचही दिवस स्थानिक वनपाल श्रीमती मेश्राम, वनरक्षक रुपाली येवले, गिरगुने, मेटकर, वाहन चालक सय्यद हसाम व शेख तस्लीन यांनी योगदान दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Guide to tourists in Melghat will guide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.