Amravati-Akola highway : राष्ट्रीय महामार्गाचा? छे, हा तर चक्क फसवणुकीचा विश्वविक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 10:35 AM2022-06-11T10:35:10+5:302022-06-11T10:48:44+5:30
या विश्वविक्रमाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही काैतुक केले. थोडक्यात, दर्जेदार रस्ते निर्मिती व उत्कृष्ट विकासकामांसाठी ख्याती असलेल्या गडकरी यांचीदेखील दिशाभूल झाली.
बडनेरा (अमरावती) : लोणी ते मूर्तीजापूरदरम्यान रस्तेबांधणीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने कुणालाही वाटेल की गेली कित्येक वर्षे रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चा प्रश्न मिटला तर ते सपशेल चूक आहे. चारपदरी महामार्गाच्या एका बाजूच्या दोन लेन सुलट व उलट मोजून ७५ किलोमीटरचा आकडा गाठला गेला. परिणामी, जवळपास बारा वर्षांपासूनच्या अकोला ते अमरावतीदरम्यानच्या मरणप्राय यातना कायम आहेत.
माेठा गाजावाजा करीत, फटाके फाेडून व मिठाई वाटून बुधवारी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ताकामाची गिनीज बुकमध्ये नाेंद सेलिब्रेट करण्यात आली. ही खऱ्या अर्थाने रस्तेबांधणीही नाही तर लाेणी ते नागठाणापर्यंत केवळ ३५ किमीचे एका बाजूच्या दोन लेनचे डांबरीकरणाचे काम पुणे येथील कंत्राटदार राजपथ इन्फ्राकॉनने केले. या विश्वविक्रमाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही काैतुक केले. थोडक्यात, दर्जेदार रस्ते निर्मिती व उत्कृष्ट विकासकामांसाठी ख्याती असलेल्या गडकरी यांचीदेखील दिशाभूल झाली.
भरीस भर म्हणजे या डांबरीकरणाचा दर्जाही अत्यंत वाईट आहे. पेव्हर मशिनने डांबरीकरण करण्यात आले. विश्वविक्रम नोंदविण्याच्या नादात रस्ते निर्मितीसाठी लागणारे दर्जेदार साहित्य, वापरले नाही. विश्वविक्रमी डांबरीकरणाचा दर्जा अतिशय सुमार आहे. काम संपल्यानंतर दोनच दिवसांत काही ठिकाणी डांबरीकरण उखडले असून गिट्टी बाहेर आली आहे. आता पावसाळा तोंडावर आहे आणि कामाचा दर्जा बघता पावसाने त्याची पोलखोल होईल, असे गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पुन्हा अपघात, आगीतून फुफाट्यात
विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर राजपथ इन्फ्राकॉनने फटाके फोडले, मिठाईचे वाटप केले. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. पुलांचे बांधकाम अपूर्ण व तिथे दिशादर्शक फलक नसल्याने गुरुवारी रात्री १०.३० वाजता कुरूमलगत ट्रक उलटला. यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. हा ट्रक शेंदोळा (बु.) येथून गुजरात येथे गट्टू वाहून नेत होता.
१२ वर्षांचा वनवास, १२ महिने त्रास
अमरावती ते मलकापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चा टापू वऱ्हाडातील जनतेसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय आहे. या मार्गावर प्रवासासाठी कित्येक तास लागतात. याच टापूत खूप अपघात होतात. अमरावती - अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीचा कार्यारंभ आदेश सन २०१० मध्ये देण्यात आला होता. परंतु, गेल्या १२ वर्षांत काहीच काम झाले नाही. काही तांत्रिक कारणांनी दाेन ठेकेदार कामे अर्धवट टाकून गेले. नंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नव्याने पुणे येथील राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. एजन्सीला १० जुलै २०२१ पासून कार्यारंभ आदेश दिले. मात्र, या कंत्राटदाराने १२ महिने काम केले नाही आणि आता विश्वविक्रमाच्या नावाने फसवणूक केली.