'गुलमोहराने' बहरला मेळघाट..!
By Admin | Published: June 5, 2016 12:04 AM2016-06-05T00:04:51+5:302016-06-05T00:04:51+5:30
विदर्भाचे नंदनवन घाटवळणाचा नागमोडी रस्ता एकीकडे प्रवासादरम्यान जीवाचा थरकाप उडविणाऱ्या दऱ्या तर दुसरीकडे गगनभेटी कातकोचे उंच पहाड, ...
निसर्गाचे देणे : डोळे दीपविणारे सौंदर्य
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन घाटवळणाचा नागमोडी रस्ता एकीकडे प्रवासादरम्यान जीवाचा थरकाप उडविणाऱ्या दऱ्या तर दुसरीकडे गगनभेटी कातकोचे उंच पहाड, झाडे आणि त्यांना भेदून जाणारे पर्यटकांचे वाहन. क्षणातच नजर पडताच वाव... क्या सीन है ! म्हणत डोळे दीपविणारे 'गुलमोहर बनाचे' रंगबिरंगी दृश्य, मेळघाटात डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले आहे.
निसर्ग सौंदर्याची उधळण होत असलेल्या मेळघाटात ऋतू पर्वानुसार रंगबिरंगी फुलाझाडांची मुक्त उधळण होत असल्याचे बघायला मिळत आहे. गुलमोहर शहरी भागासह ग्रामीण भागात मोहरला आहे. मात्र मेळघाटच्या घाटवळणावर ठिकठिकाणी लाल गुलाबी रंगाची फुले मन वेधून घेणारी ठरली आहे.
परतवाडा घटांग चिखलदरा मार्गाने ठिकठिकाणी गुलमोहराचे 'बन' आहेत. एकत्र असलेल्या या झाडांची फुले उमलल्याने प्रवाशांना आपल्या सौंदर्याने खुणावत आहे. पिवळ्या रंगाचा अंमलताससुद्धा रस्त्यासह उंच टेकड्यावर खुनावतोय, मात्र घाटवळणावर मोहरलेला 'गुलमोहर' डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आहे. सध्या येथील वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)