अमरावतीत झोपडपट्टीदादांचे ‘गुंडाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:00 PM2019-01-12T23:00:44+5:302019-01-12T23:01:11+5:30

शहरातील काही परिसरात झोपडपट्टीदादांचा गुंडाराज असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री महाजनपुऱ्यात काही गुंडांनी हैदोस घालत एका घरात शिरून तोडफोड केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दसरा मैदानामागील कृष्णार्पण कॉलनी चौकात गुंडगिरी प्रवृत्तीतूनच गुंडानी हैदोस घातला. या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

'Gundaraj' of slums in Amravati | अमरावतीत झोपडपट्टीदादांचे ‘गुंडाराज’

अमरावतीत झोपडपट्टीदादांचे ‘गुंडाराज’

Next
ठळक मुद्देमहाजनपुऱ्यात तणावाची स्थिती : कृष्णार्पण कॉलनी चौकातही एक घटना, खोलापुरी गेट पोलिसांनी केली तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील काही परिसरात झोपडपट्टीदादांचा गुंडाराज असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री महाजनपुऱ्यात काही गुंडांनी हैदोस घालत एका घरात शिरून तोडफोड केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दसरा मैदानामागील कृष्णार्पण कॉलनी चौकात गुंडगिरी प्रवृत्तीतूनच गुंडानी हैदोस घातला. या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
महाजनपुºयात १० जानेवारी रोजी नीलेश वाघमारे यांच्यावर काही तरुणांनी चाकुहल्ला चढविला. त्यात नीलेश गंभीर झाला. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी चार ते पाच तरुणांविरुद्ध भादंविच्या कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. मात्र, आरोपी मोकाट असल्याने दहशत कायम आहे. त्यातच शुक्रवारी रात्री महाजनपुरा परिसरात काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गणेश भीमराव कलाने यांच्या घरावर हल्लाबोल केला. त्यांनी कलाने यांच्या घरात शिरून साहित्याची फेकफाक केली. टीव्ही, खुर्चा, दारे, आलमारीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गुंडांनी कलाने यांच्या कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
घटनेच्या माहितीवरून खोलापुरी गेटसह अन्य ठाण्यांच्या ताफ्यासह क्यूआरटीच्या ताफ्याने घटनास्थळ गाठले. महाजनपुºयात पोलिसांच्या ताफ्याने शुक्रवारी रात्री तळ ठोकला होता. पोलिसांनी तणावाची स्थिती हाताळली.
दरम्यान, शनिवारी खोलापुरी गेटचे ठाणेदार अतुल घारपांडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
कर्फ्यूसदृश स्थिती
महाजनपुरा परिसरात गुंडांचा हैदोस वाढला असून, नागरिक दहशतीत आले आहेत. नागरिकांनी घरातून बाहेर निघणेही बंद केले होते. गुरुवारी व शुक्रवारी रात्री घडलेल्या गंभीर घटनेनंतर पोलिसांचा मोठा ताफा या परिसरात तैनात करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी रात्री या परिसरात कर्फ्यूसदृश स्थिती होती. रस्त्यावर एकही व्यक्ती नव्हती. एक मद्यपी रस्त्यावर येऊन पोलिसांशी हुज्जत घालताना आढळून आला. मात्र, त्यालाही चोप देऊन घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला.
कृष्णार्पण कॉलनीतही गुंडाचा धुमाकूळ
दसरा मैदानामागील कृष्णार्पण कॉलनी चौकातच मांडवा नावाची अनधिकृत झोपडपट्टी वसली आहे. या झोपडपट्टीत गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर आहे. याशिवाय अवैध दारू व्यवसायांसह गुंडगिरीचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी रात्री काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मद्यपान करून तेथील पानटपरीचालकाशी दादागिरी करीत उधारीत सिगारेट मागितली. त्याने नकार दिल्यानंतर मद्यपींनी वाद घातला तसेच तलवार काढून पानटरीचालकावर चालविली. मात्र, सुदैवाने ती लागली नाही. त्यानंतर पानटपरीचालकाचे समर्थक व गुंडांमध्ये हाणामारी झाल्याने गोंधळ उडाला. रात्री ९ वाजताच कृष्णार्पण कॉलनीत चौकातील सर्व व्यावसायिकांनी आपआपली दुकाने बंद केली. गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णार्पन कॉलनी चौकात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेत कामेश जनार्दन नितनवरे, रूपेश सोळंके यांच्यासह पानटपरीचालक योगेश रामभाऊ पुराम जखमी झाला आहे. राजापेठ पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा नोंदविला आहे.
झोपडपट्टीदादा कायद्यान्वये कारवाई करा
आमलेवाडी स्थित महाजनपुरा परिसरात अजय भगवान पाटील, शिवा शेषराव सरदार, निशांत दिलीप इंगळे, गोचू यांच्यासह अनेक जण अवैध दारू व्यवसायाच्या बळावर गुंडगिरी करतात. त्यांनी गणेश कलाने यांच्या घरावर हल्ला करून साहित्याची तोडफोड केली तसेच परिसरात खुलेआम तलवारी काढून नागरिकांमध्ये दहशत पसरवित असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात तेथील नागरिकांनी शनिवारी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून या गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांविरुद्ध झोपडपट्टीदादा कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी निवेदनाची एक प्रत गृहराज्यमंत्री, पालकमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांनीही पाठविली आहे. यावेळी बाली वानखडे, सुनीता हिवराळे, कौशल्या कलाने, शांताबाई वाघमारे, मंगला इंगोले, शांता कलाने, सखुबाई खडसे, पूजा कलाने, अनिता कलाने, सरला स्वर्गे आदी महिला व पुरुष पोलीस आयुक्तालयासमोर गोळा झाले होते.

Web Title: 'Gundaraj' of slums in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.