गुरूकुंज मोझरी नि:शब्द!
By admin | Published: October 13, 2014 11:14 PM2014-10-13T23:14:53+5:302014-10-13T23:14:53+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार १३ आॅक्टोबर रोजी जमलेल्या लाखो गुरूदेवप्रेमींनी राष्ट्रसंतांना साश्रूनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली : देशभरातून जमले लाखो भक्त
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार १३ आॅक्टोबर रोजी जमलेल्या लाखो गुरूदेवप्रेमींनी राष्ट्रसंतांना साश्रूनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रसंतांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी लाखो भाविकांचा मेळा दुपारी २ वाजतापासून कार्यक्रमस्थळी मुख्य मंडपात गोळा झाला होता.
दोन मिनिटे पाळला मौन
अमरावती : मराठी पंचांगानुसार अश्विन कृष्ण वद्य पंचमीला दुपारी ४.५८ ला राष्ट्रसंत श्री तुकोडजी महाराजांचे महानिर्वाण झाले होते. (११ आॅक्टोबर १९६८) तेव्हापासून दरवर्षी या दिवशी ४.५८ वाजता राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो गुरूदेवप्रेमी देशभरातून गुरूकुंजात दाखल होतात. दोन मिनीट गुरूकुंंज मोझरीत कमालीची शांतता पसरते. स्वर्ग प्राप्तीसाठी भक्ती करण्यापेक्षा संपूर्ण संसार स्वर्गमय करण्याची शिकवण समाजाला देणाऱ्या व घरदार न सोडता संसारात अमरपदप्राप्तीचे धडे जनतेला देणाऱ्या राष्ट्रसंतांचे विचार अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालणारे होते. त्यामुळे राष्ट्रसंतांचा ‘महापरिनिर्वाण’ दिन गुरूदेवप्रेमी संकल्पदिन म्हणून साजरा करतात.
मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी ३.३० वाजता ‘गुरूदेव हमारा प्यारा है, जीवन का उजीयारा है’ या राष्ट्रसंतांच्या भजनाने सुरूवात झाली. मौन श्रद्धांजलीनिमित्त खास संहिता तयार करुन संहितेचे वाचन अत्यंत भावविभोरपणे उपस्थितांसमोर केले गेले. या संहितेमध्ये
‘‘गुरूनाम की नैया
हमें भव-दु:ख से तरवायेगी।
गुरू की चरणरज ही
हमे मन-भौर से हरवायगी।।
गुरू-प्रेम की बरखा
हमें सत ज्ञानको बतलायेगी।
गुरू की कृपा हमको सौख्य में मिलवायगी।।’
या गुरूला आर्जव करणाऱ्या भजनांची साद घातली गेली. तर सद्यस्थितीवर प्रकाश टाकून राष्ट्रसंतांनी धर्मांधतेच्या विरोधात फटकारलेल्या
ऐ धर्मवालों,
धर्मसे तुमने किया बेपार है।
सब देवता करके अलग,
फैला दिया व्यभीचार है।।
इन्सान को हैवान कर,
झगडा मचाया धर्म का।
भगवान तो पिछे रहा,
सब पेटपुंजीही जगी।।
या भजनाद्वारे प्राण फुंकले गेले. समाजातील वाढत्या साधुगिरीवर प्रहार करणाऱ्या
‘अब तो सब पंडितोंकी
साधुओंकी मौत है।
जाना उन्होंने धर्म नहीं था,
क्या हमारी बात है।।
अशी एकापेक्षा एक समाजातील अनिष्ट चाली-रुढींवर प्रहार करणाऱ्या राष्ट्रसंतांची भजने गायिल्याने मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अधिकच भावविभोर झाला. यावेळी सर्व परिसर निरव व नि:शब्द झाला होता. राष्ट्रसंत पुन्हा विराजमान होऊन भक्तांसोबत संवाद साधत असल्याचा भास प्रत्येकाला होत होता. मौन श्रध्दांजलीच्या वेळी एवढी तन्मयता राष्ट्रसंतप्रेमींमध्ये बघायला मिळाली. ठीक ४.५८ वाजता महाद्वारावरील घंटा निनादली आणि राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो राष्ट्रसंतप्रेमी राष्ट्रसंतांच्या महासमाधीकडे वळले. यावेळी महामार्गावरील वाहतूकसुध्दा बंद होती. या कार्यक्रमाची संहिता उपसर्वाधिकारी व राष्ट्रसंतांचे गाढे अभ्यासक रूपराव वाघ यांनी तयार केली. कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे यांनी केले. मौन श्रध्दांजलीदरम्यान मोझरीमध्ये दोन मिनिटे निरव शांतता पसरली होती. सारा आसमंत गुरूदेवमय झाले होते. पुण्यतिथी महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून या कार्यक्रमासाठी गुरूदेवप्रेमींनी हजेरी लावली होती. मौन श्रध्दांजलीसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.