गुरुदासबाबाचा दावा, म्हणे वयाच्या १२ व्या वर्षी कृपाप्रसाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:36 AM2023-03-28T10:36:27+5:302023-03-28T10:40:29+5:30
स्वत:ची सच्चिदानंद, संत म्हणून भलामण : अंनिसने घ्यावा पुढाकार
प्रदीप भाकरे/ मनीष तसरे
मार्डी (अमरावती) : कधीकधी आपल्या शरीरात दैवी शक्तीचा संचार होत असल्याचा दावा करत सुनील कावलकर ऊर्फ गुरुदासबाबा चारधाम यात्रेला निघून गेले आहे. स्वत:ची सच्चिदानंद, संत म्हणून भलामण करत असताना, आपल्याला वयाच्या १२व्या वर्षी श्री शेषशायी भगवान नागदेवता, अन्नपूर्णा माता व सद्गुरू गुणवंतबाबांचा कृपाप्रसाद मिळाल्याचा बाबाचा दावा फलकाच्या रूपाने त्यांच्याच आश्रमात लावून ठेवण्यात आला आहे.
मी संत आहे, सच्चिदानंद आहे, हे स्वत:च लिहून ठेवल्याने, गुरुदासबाबाच्या तव्यावरील फालतू व थोतांड प्रयोगाला आत्मस्तुतीची जोड मिळाल्याची भावना मार्डीकरांनी व्यक्त केली आहे. आमच्याच गावचा सुनील कावलकर, आमच्यासोबत शिकला, राहिला. त्यामुळे तो कसा आहे, हे आमच्यापेक्षा अधिक कुणी जाणू शकतो काय, असा सवाल करत, वयाच्या १२व्या वर्षी गुरुदासबाबाला कृपाप्रसाद मिळाला अन् आम्हाला कसे माहीत नाही, असा सवाल मार्डीकरांनी उपस्थित केला आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केवळ वृत्तपत्रात निवेदन न करता, त्याचा आश्रम गाठून तव्यावरील प्रयोगातील फोलपणा व लोकांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ थांबविण्यात पुढाकार घ्यावा, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
...तर मग बाबाने मार का खाल्ला!
सुनील कावलकर ऊर्फ गुरुदासबाबाच्या दाव्याला दस्तुरखुद्द मार्डीकरांनीच आव्हान दिले आहे. बाबात एवढे सत्त्व आहे तर ते स्वत:वरील हल्ला का रोखू शकले नाहीत. ते रक्तबंबाळ का झालेत, लोकांचे दु:ख हरण्याचा दावा करणाऱ्या बाबाने स्वत:च्या मठातील दरोडा का रोखला नाही, त्यावेळी त्यांच्यात दैवी शक्तीचा संचार का झाला नाही, असा संतप्त सवाल मार्डीकरांचा आहे. ११ ऑगस्ट, २०१९ रोजी आपल्या मठात सात ते आठ दरोडेखोरांनी अज्ञात वाहनातून प्रवेश करून दरोडा टाकल्याची तक्रार गुरुदासबाबाने कुऱ्हा पोलिसांत नोंदविली होती. त्या संदर्भाने मार्डीकर आता उघडपणे बोलू लागले आहेत.
‘व्हायरल बाबा’ तव्यावरून उठून थेट चारधाम यात्रेला; बाबांचा दरबारही झाला बंद
का आव्हान दिले मार्डीकरांनी?
गुरुदासबाबाच्या आश्रमात त्यांचे जीवनकार्य दर्शविणारे मोठमोठे फलक लागले आहेत. त्यात बाबाची इमेज ‘लार्जर दॅन लाइफ’ दर्शविण्यात आली आहे. बाबाला कसा कृपाप्रसाद मिळाला, तेही लिखित स्वरूपात अंध भक्तांसाठी उपलब्ध आहे. असे असताना बाबा स्वत:च्या आश्रमावर पडलेला दरोडा का थांबवू शकले नाहीत? दरोडेखोरांनी आपल्या शिरावर माठ फोडल्याचे बयाण बाबानेच दिले होते. दरोडेखोर चार अंगठ्या अन् दीड लाखांची रोकड घेऊन पळाल्याचे बाबा सांगत सुटला होता. त्यावेळी बाबाने पोलिसांना दरोडेखोरांचे नाव व चेहरे का सांगितले नाहीत, अन् कळस म्हणजे कधी-कधी संचारत असलेली दैवी शक्ती त्यावेळी का संचारली नाही, यातूनच बाबाचा भंपकपणा उघड होत असल्याचे मार्डीकरांचे मत आहे.
तो दरोडा नव्हताच, वाकड्या नजरेने पाहिल्याने राडा
मार्डीकरांच्या दाव्यानुसार, तो दरोडा नव्हताच. बाबाने एका भक्ताला सव्वा महिन्याचा उपचार सांगितला होता. त्या भक्ताला आश्रम कम मठात राहण्याची सूचना होती. त्यानुसार, भक्त राहिलाही. मात्र, सव्वा महिने उपवासाच्या नावावर आपल्या आप्ताशी काही वाईट होत असल्याची चुणूक काहींना लागली. त्यातून तो राडा झाला असावा, अशी शक्यता काहींनी वर्तविली. काहींनी त्याच कारणाने झाला, असा भक्कम दावाही केला. त्याच कारणामुळे बाबाने दरोड्याची चौकशी कुठपर्यंत आली, याचा कधीही फॉलोअप घेतला नसल्याचेही मार्डीकरांचे म्हणणे आहे.