बैतूल-घाटलाडकी मार्गावर १४ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 04:41 PM2022-01-23T16:41:36+5:302022-01-23T16:47:24+5:30
संशयित चारचाकी वाहनाची थांबवून आत असलेल्या मालाची पाहणी केली असता, प्रतिबंधित गुटख्याचे खाकी, पांढरे पोते मिळून आले.
अमरावती : ब्राह्मणवाडा थडी येथील जाणाऱ्या बैतूल-घाटलाडकी मार्गावर १४ लाखांचा गुटखा २३ जानेवारी रोजी जप्त करण्यात आला. चारचाकी वाहनासह एकूण २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ब्राह्मणवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनुसार, गोपनीय माहितीवरून २३ जानेवारी रोजी पहाटे ५ च्या सुमारास बैतूलवरून घाटलाडकीला जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. एका संशयित चारचाकी वाहनाची थांबवून आत असलेल्या मालाची पाहणी केली असता, प्रतिबंधित गुटख्याचे खाकी, पांढरे पोते मिळून आले. या मालाची एकूण किंमत १४ लाख २० हजार रुपये एमपी ०४ जीए क्रमांकाच्या दहा लाखांच्या वाहनासह एकूण २४ लाख २० हजार रुपयांचा माल मिळून आला. मुद्देमाल व वाहन जप्त करून मनीष इमरत धुर्वे (२५, रा. उरदन, बैतूल), सुनील रतन साहू (४२, रा. गेंदा चौक, बैतूल) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्यात कलम १८८, २७२, २७३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रभारी ) नीलेश पांडे, ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राजस, नायक पोलीस काॅन्स्टेबल सचिन भोंबे यांनी कामगिरी केली.