सातपुड्याच्या पायथ्याशी गुटखा निर्मिती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:30+5:302021-07-19T04:10:30+5:30
परवासाठी वनोजा बाग : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून गुटखा विक्री व उत्पादन करण्यास बंदी असली तरी गुटख्याची मागणी ...
परवासाठी
वनोजा बाग : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून गुटखा विक्री व उत्पादन करण्यास बंदी असली तरी गुटख्याची मागणी व विक्री तडाखेबंद असल्याचा फायदा घेत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चक्क गुटखा बनवण्याची मशीनच लावण्यात आली होती. अंजनगाव पोलिसांनी धाडी येथे शनिवारी केलेली कारवाई ही यामुळे संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन करणे आणि विक्री करणे यावर संपूर्ण बंदी आहे. तरीही तस्करीच्या माध्यमातून आजूबाजूच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटखा येतो आणि तो सहज कोणत्याही पानटपरीवर उपलब्ध होतो. परंतु, गुटख्याची किंमत अव्वाच्या सव्वा असल्याने त्याचेच उत्पादन घेण्याची शक्कल धाडी येथील संदीप जाधव याने लढविली आणि त्यासाठी लागणारे साहित्य यंत्रसामग्रीसह आणले. त्याआधी संदीपने मध्य प्रदेशातील इंदूर येथे गुटखा बनवणाऱ्या कारखान्याला भेट देऊन संपूर्ण माहिती गोळा करून हा प्रकार केल्याचे समजते. त्याने गुटखा बनवल्याचे माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
गुटखा पॅकिंग मशीनची कमाल
पान बहार व विमल गुटख्यासारख्या भासणाऱ्या गुटख्याच्या पुड्या सीलबंद करण्याची मशीनच घरी असल्याने तशा स्ट्रीप मिळवून संदीपने उत्पादन सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन्ही गुटख्याचे अनुक्रमे ६१५० व २८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी येथून जप्त केला.
-------------
कच्च्या साहित्याची ऑनलाईन मागणी
संदीप जाधवने गुटखा पॕॅक करण्याची मशीन १ लक्ष ३० हजार रुपयांना घरी आणली. याशिवाय गुटख्याची पुढील खेप काढण्यासाठी कच्च्या मालाकरिता ऑनलाईन ४० हजार रूपये पाठविल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. जर पोलीसांना ही गुप्त माहीती मिळाली नसती, तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात नकली गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात झाली असती, यात शंका नाही.
कोट १
संपुर्ण महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही आमच्या हद्दीमध्ये असा प्रकार घडत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर आम्ही आरोपीवर कारवाई केली. यानंतर असा प्रकार कोठेही उघडकीस आल्यास पोलीस कठोर कारवाई करतील. अवैध धंद्यांबाबत नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी.
विशाल पोळकर, दुय्यम ठाणेदार, अंजनगाव पोलीस ठाणे