तोतया लवाद अधिकाऱ्याविरोधात उभा ठाकला जीम ट्रेनर; फसवणुकीचा गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: January 4, 2023 01:19 PM2023-01-04T13:19:05+5:302023-01-04T13:40:25+5:30

केस चालविण्यासाठी घेतली रक्कम, अमरावतीमध्ये थाटले होते समांतर न्यायालय

Gym Trainer Complaint Against Fake Arbitration Officer; Fraud case registered | तोतया लवाद अधिकाऱ्याविरोधात उभा ठाकला जीम ट्रेनर; फसवणुकीचा गुन्हा दाखल

तोतया लवाद अधिकाऱ्याविरोधात उभा ठाकला जीम ट्रेनर; फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next

अमरावती : तोतया लवाद अधिकारी सिध्दार्थ रामटेके याच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा सलग दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गाडगेनगर पोलिसांनी ३ जानेवारी रोजी उशिरा रात्री रामटेकेविरूध्द एफआयआर दाखल केला. रामटेके याने स्वत:ची लवाद अधिकारी म्हणून ओळख करून देऊन आपली सुमारे ३० हजार ६०० रुपायंनी फसवणूक केल्याचे रवींद्र जरूदे (४४, रा. रवीनगर) यांनी तक्रारीत म्हटले आहे. जरूदे हे व्यवसायाने जिम ट्रेनर आहेत.

तक्रारीनुसार, जरुदे यांनी घरगुती संबंध असणारे सुधीर थोरात यांना सन २०१६ मध्ये काही रक्कम उसनवार दिली होती. पण बराच काळ होवूनही त्याने रक्कम परत केली नाही. दरम्यान, ती रक्कम काढण्यासाठी जरूदे यांनी पंचवटी चौकस्थित लवाद न्यायाधिकरण गाठले. त्यावेळी सिध्दार्थ रामटेके याने तो स्वत: पंचवटी चौकातील लवाद न्यायाधीकरण कार्यालयाचा प्रमुख असल्याची बतावणी केली.

त्या केससाठी सुरवातीला २० हजार रुपये व केसचा निकाल लागल्यावर ५० हजार रुपये दयावे लागेल असे बोलून रामटेके याने जरूदेंकडून ३० हजार ६०० रुपये घेतले. बरेच दिवस होवूनही जरूदे यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी केस मागे घेण्याकरीताच्या दस्तऐवजासह रक्कम परत मिळण्याबाबत अर्ज केला. त्यावर रामटेके याने जरूदे यांना दोन ते तीन महिने फिरविले. ७ एप्रिल २०२१ रोजी आरोपीने जरूदे यांना त्याच्या लवाद न्यायाधिकरणात बोलावून केस मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

अशी आहे तक्रार

आरोपी सिध्दार्थ रामटेके याच्याकडे लवाद न्यायाधिकरण चालविण्याची कोणतीही शासकीय परवानगी नसतांना त्याने स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी स्वत: लवाद अधिकारी असल्याचे भासविले. लबाडीने बोलून खोटे दस्तऐवज तयार केले. फिर्यादीला पैशाची मागणी करुन केसचा लवकरात लवकर निकाल लावून देतो असे बोलून ४ मे २०२० ते १७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ३० हजार ६०० रुपये घेतले व फसवणूक केली.

येथील पंचवटी चौकात लवाद न्यायाधिकरण थाटून स्वत:ची ओळख लवाद अधिकारी म्हणून करून देणाऱ्या सिद्धार्थ रामटेके याला गाडगेनगर पोलिसांनी नोव्हेंबर २२ मध्ये अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे. गाडगेनगर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी सिद्धार्थ रामटेके व त्याच्या एका सहकारी महिलेविरुद्ध अभय रवींद्र उके यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. लवाद न्यायालयात दाखल प्रकरणाचा निकाल एक महिन्यात लावून देतो व थकीत घरभाडेसुद्धा वसूल करून देतो, अशी बतावणी करून रामटेके व एका महिलेने त्यांच्याकडून २३ जुलै रोजी ५० हजार रुपये रोख घेतले. मात्र, काम न करता फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी नोंदविली होती.

लवाद न्यायाधिकरणाच्या नावावर ज्यांची रामटेकेंकडून आर्थिक फसवणूक झाली, त्यांनी तक्रार व गुन्हा नोंदविण्यासाठी समोर यावे. यापुर्वीच्या तक्रारीेवरून रामटेकेला अटक करण्यात आली होती.

- पुनम पाटील, सहायक पोलीस आयुक्त

Web Title: Gym Trainer Complaint Against Fake Arbitration Officer; Fraud case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.