हाफकीन थांबले : ‘इर्विन’ने डीपीडीसीतून खरेदी केली आठ कोटींची औषधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 02:58 PM2023-10-05T14:58:19+5:302023-10-05T14:58:45+5:30
मोफत आरोग्य सेवेमुळे रुग्णांची संख्या वाढली, सोयी-सुविधा कमीच
अमरावती : शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा मोफत करून राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. परंतु, आरोग्य यंत्रणा सुरळीत चालविण्यासाठी लागणाऱ्या सोयी - सुविधांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी वाढल्याने औषधांची मागणीही वाढली. परंतु, मागील दीड वर्षांपासून हापकीनकडून मिळणारा औषध पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला स्थनिक डीपीडीसी फंडातून औषधी खरेदी करावी लागत आहे. मागील वर्षभरात आठ ते नऊ कोटी रुपयांची औषधी खरेदी केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
राज्यात १५ ऑगस्टपासून सर्व शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा राज्य शासनाने मोफत केली. याचा परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील रोजची ओपीडी सातशेवरून बाराशेच्या घरात पोहचली. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतरही शासकीय रुग्णालयांमध्येही पाहायला मिळत आहे. परंतु, रुग्णालयातील सोयी - सुविधा, मनुष्यबळ संख्या मात्र वाढली नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयात काम करताना डॉक्टर तसेच इतर नर्सिंग स्टाफ यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला पुढे आरोग्य यंत्रणेला जावे लागत आहे. तसेच वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे औषधांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु, मागील दीड वर्षांपासून शासनस्तरावर हापकीनकडून मिळणारी औषधे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे औषधांचा तुटवडा भरून काढण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला डीपीडीसी फंडातून तसेच रुग्णालयासाठी शासनस्तरावर मिळणाऱ्या निधीतून औषधांची खरेदी करावी लागत आहे. मागील वर्षभरात आठ ते नऊ कोटी रुपयांची औषधी ही डीपीडीसी फंडातून खरेदी करण्यात आली आहे.
दहा कोटींच्या औषधीची मागणी
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या औषध भांडारमध्ये दीड ते दोन महिन्यांचा औषधसाठा उपलब्ध आहे. परंतु, तरीही औषधांची गरज लक्षात घेता दहा कोटी रुपयांच्या औषधीची मागणी ही डीपीडीसीकडे केली आहे. त्यामुळे सध्याचा औषधसाठा संपण्यापूर्वी ही औषधी रुग्णालय प्रशासनाला मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
...या रुग्णालयांना होतो औषधांचा पुरवठा
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील औषधी भांडारमधून २ जिल्हा स्त्री रुग्णालये, ९ ग्रामीण रुग्णालये, ५ उपजिल्हा रुग्णालये, ५ ट्रामा केअर युनिट, विदर्भ सेवा रुग्णालय या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा केला जातो. ही सर्व रुग्णालये मिळून महिन्याला जवळपास दोन ते तीन कोटी रुपयांच्या औषधांची गरज भासते.
रुग्णालयात औषधांची कमी नाही. दोन महिने पुरेल इतका औषधसाठा आहे. औषधांची गरज लक्षात घेता डीपीडीसी तसेच शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून ती खरेदी केली जातात. दीड वर्षांपासून हापकीनकडून औषधी मिळणे बंद आहे.
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक