पुन्हा पावसासह गारपीट!
By admin | Published: January 19, 2015 11:57 PM2015-01-19T23:57:21+5:302015-01-19T23:57:21+5:30
पश्चिमी विक्षेप आणि पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे यांच्या परस्पर संबंधामुळे पुन्हा विदर्भात पाऊस पडणार असून काही ठिकाणी गारपीट व विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
वैभव बाबरेकर - अमरावती
पश्चिमी विक्षेप आणि पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे यांच्या परस्पर संबंधामुळे पुन्हा विदर्भात पाऊस पडणार असून काही ठिकाणी गारपीट व विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
डिसेंबर २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील पारा ७.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरला होता. त्यानंतर नववर्षाच्या स्वागताच्यावेळी विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात थंडी जाणवली. सद्यस्थितीत थंडीचा जोर कमी झाला आहे. मात्र, तरीसुध्दा बोचऱ्या थंडीचा सामना विदर्भवासियांनी करावा लागत आहे. कमी-अधिक थंडीमुळे नागरिकांची दिनचर्या विस्कळीत झाली असून आता पुन्हा विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून बांग्लादेशावर चक्राकार वारे वाहत आहेत. २० जानेवारीपर्यंत दक्षिण मध्यप्रदेशात थंडीची लाट असल्याने अमरावती जिल्ह्यातसुध्दा थंडी कायम राहणार आहे.
किमान तापमान १० डिग्री सेल्सिअसच्या मागेपुढे राहील, त्यामुळे पर्वतीय भागात काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षेप आणि पुर्वेकडून वाहणारे उष्ण वारे यांच्या परस्पर संबंधांमुळे २१ जानेवारीनंतर विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच काही ठिकाणी गारपिटीसह विजेचा गडगडाट आणि पाऊस कोसळण्यास परिस्थीती अनुकुल असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.