चांदूरबाजार तालुक्यातील गारपीटग्रस्तांना मदतीची आस ?
By admin | Published: June 12, 2016 12:09 AM2016-06-12T00:09:26+5:302016-06-12T00:09:26+5:30
तालुक्याला २८ व २९ फेब्रुवारी रोजी जबरदस्त गारपिटीसह वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
१० हजार हेक्टर क्षेत्राला फटका : फळपिकांचे सर्वाधिक नुकसान
चांदूरबाजार : तालुक्याला २८ व २९ फेब्रुवारी रोजी जबरदस्त गारपिटीसह वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यात तालुक्यातील ७ मंडळांपैकी ६ मंडळांतील १४ हजार ७९१ शेतकऱ्यांचे १० हजार २४२ हेक्टर वरील विविध पिकांना फटका बसला होता. यात सर्वाधिक नुकसान फळपिकाचे झाले होते. याला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांपर्यत मदत पोहचली नाही. परिणामी गारपीटग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
१६ मार्च २०१६ याबाबतचा अंतिम अहवाल तालुका महसूल विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला. परंतु याबाबत मंत्रिमंडळाकडून कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ही मदत केंव्हा मिळणार, हे अजून अनिश्चितच आहे. आधीच दुष्काळ, त्यात गारपिटीचा दुष्काळात तेरावा महिना झाल्याने गारपीटग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मदतीची आतुरतेने वाट पाहत असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे डोळे लागले आहे. परंतु राज्य शासनाची शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याची धिम्या गतीची पद्धत पाहता हा दिवस कधी उजाडेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
महसूलच्या अंतिम अहवालानुसार तालुक्यात चांदूरबाजार मंडळातील २४ गावांमधील २ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, ३९५ हेक्टर हरभरा, ६३८ हेक्टर कांदा व १३७ हेक्टर फळपिके व १ हजार १०४ हेक्टर इतर पिके ८८ हेक्टरबाधीत झाले आहे. तसेच बेलोरा मंडळातील २६ गावांना गारपीटीचा फटका बसला असून यात एकूण ६४३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. शिरजगाव कसबा मंडळात २२ गावांमधील २ हजर ४१३ हेक्टर क्षेत्र बाधीत असून, यात पीकनिहाय क्षेत्र गहू ४०५ हेक्टर, हरभरा १०८ हेक्टर, कांदा ३६३ हेक्टर, फळपीक १ हजर ७७९ हेक्टर, व इतर पिके ५७ हेक्टर इत्यांदीचा समावेश आहे. तसेच करजगाव मंडळामध्ये १८ गावांतील १ हजार हेक्टर फळपिके, १ हजार ९० हेक्टर इतर पिके प्रभावित झाले होेते, तर तळेगाव मोहना मंडळामधील ११ गावांतील १ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र गारपिटीने बाधित झाले. यात गहू ४२३ हे. कांदा १०२ हे. फळपिके १ हजार ७१ हे. इतरपिके २४ हेक्टरचा समावेश आहे. आसेगाव मंडळात १८ गावांमधील १ हजार ९४ हेक्टर क्षेत्राला गारपीटचा दणका बसला असून यात गहू ३९२ हेक्टर, हरभरा ४०४ हेक्टर, कांदा ८८ हेक्टर, फळपीके १५२ हेक्टर, इतर पिके ५७ हेक्टर असा पिकनिहाय समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)