गारपीट, अवकाळीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:10 PM2018-02-11T23:10:00+5:302018-02-11T23:13:38+5:30
जिल्हाभरात रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी गारपिटीचे स्वरूप घेतले. अवकाळीचा रबी पिकांना फटका बसला आहे.
अमरावती : जिल्हाभरात रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी गारपिटीचे स्वरूप घेतले. अवकाळीचा रबी पिकांना फटका बसला आहे. नायगाव येथे एका वृद्धाचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर वाई शिवारात आठ गोवंश दगावले. अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, भातकु ली, धारणी या तालुक्यांत गारपीट झाली. अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी व वरूड येथे संत्राबागांचे मोठे नुकसान झाले.
रविवारी सकाळी ८ वाजता अचलपूर तालुक्यातील काकडा, शिंदी, पोही, कुष्टा बु, भिलोना, तुळजापूर, खांभोरा, नायगाव, रासेगाव, इसेगाव, चमक, खोजनपूर, खानापूर, जवर्डी, भूगाव, बोरगाव या गावांमध्ये अवकाळी पावसापाठोपाठ झालेल्या गारपिटीने ने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. संत्र्याचा मृग बहर पूर्ण खाली आला. शेतात सोंगून ठेवलेला हरभरा भिजला. गव्हाचे नुकसान झाले आहे.
चांदूर बाजार तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके प्रभावित झाली. यामध्ये मुख्यत: संत्रा, हरभरा, कांदा, गहू या पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक गारपीट जालनापूर, कुरळपूर्ण, थुगाव, शिरजगाव अर्डक, जसापूर, बोरज, हैदतपूर, काजळी या ठिकाणी झाल्याची माहिती आहे. संत्र्याच्या आंबिया बहराचा फुलोर गारपिटीमुळे पूर्णत: गळला.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात पहाटे गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. कापूसतळणी, विहिगाव, चिंचोली, सातेगाव, मुऱ्हादेवी, गावंडगाव, टाकरखेडासह अन्य गावांत गारांचा खच पडला. काही ठिकाणी त्या संत्र्याच्या आकाराच्या असल्याचे वृत्त आहे. गारपिटीत संत्रा, केळी, हरभरा व गव्हाचे मोठे नुकसान झाले.
वरूड तालुक्यात जरुड, बेनोडा, मांगरुळी शिवारात तुरळक गारपीट झाली. आमनेर, वाठोडा, एकदरा, देऊतवाडा, वघाळ, नांदगाव, वंडली, राजुरा बाजार, हातुर्णा, लोणी, मांगरुळी, जामगाव, तिवसाघाट, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, शेंदूरजनाघाट, पुसला, सावंगी, बेनोडा, गणेशपूर, लिंगा आदी परिसरात पावसाने थैमान घातले होते. संत्रा तसेच इतर पिकांचे यामुळे नुकसान झाले. या पावसाने गहू, हरभरा ही पिकेही गारद केली आहेत. दर्यापूर तालुक्यातील येवदा, दारापूर, वडनेरगंगाई, रंभापूर परिसरात गारपीट झाली, तर संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसानेही हजेरी लावली.
मोर्शी तालुक्यात १० वाजता वाजता गारपीट सुरू झाली. गवळी, चिखलसावंगी, पाळा, गणेशपूर, रेडवा, सालबर्डीचा परिसर या ठिकाणी गारपीट झाली. भातकुली तालुक्यात गारपिटीमुळे टाकरखेडा संभू, साऊर, आष्टी परिसरात शेतात लावलेल्या तुरीच्या गंज्या ओल्या झाल्या होत्या.
अचलपुरातील ९० गावांना फटका
अमरावती : अचलपूर तालुक्यातील अचलपूर, रासेगाव, असदपूर, परसापूर आणि पथ्रोट या सहा मंडळांतील जवळपास ९० गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. संत्रा, केळी, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंडळ अधिकारी, पटवारी, कृषी सहायकांना नुकसानाच्या पाहणीचे आदेश दिले असल्याची माहिती तहसीलदार निर्भय जैन यांनी दिली.
मोर्शी तालुक्यात संत्र्याचे सौदे सुरू होताच गारपीट झाल्याने बागायतदारांचे नुकसान झाले. कांदा पिकाचेही नुकसान झाले. तलाठी व महसूल अधिकाऱ्यांना गारपिटीची पाहणी लवकरच करून अहवाल शासनाला पाठविण्यात येईल, अशी माहिती मोर्शीचे उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांनी दिली. गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे तयार करण्याच्या सूचना आ. बोंडे यांनी केल्या आहेत.
धारणीत दोन डॉक्टर जखमी
धारणी शहर वगळता तालुक्यात सर्वत्र गारपीट झाल्याची माहिती आहे. धूळघाट रेलवे परिसरात अर्धा किलो वजनाची गार पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. भरारी पथकाचे डॉक्टर अहिरकर व शेख गारपिटीत जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. एका अॅम्ब्यूलंसच्या काचा तडकल्या. डिजिटल व्हिलेज हरिसाल येथेही गारपीट झाली. गारपिटीमुळे वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे तालुक्यातील १७० गावांमध्ये सकाळपासूनच वीज गूल झाली. वृत्त लिहिस्तोवर सर्व गावे काळोखात होती.
गारपीट, अवकाळीच्या नुकसानाचे पंचनामे करा : पालकमंत्री
अमरावती : जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शिवारात झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहेत. नागपूर दौऱ्यावर जात असताना पालकमंत्र्यांनी काही शेतांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. पालकमंत्री म्हणाले, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करावी. ज्यांचे या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले आहे, त्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
बच्चू कडूंनी केली पाहणी
आ. बच्चू कडू यांनी नुकसानग्रस्त जसापूर, शिरजगाव अर्डक, काजळी शिवारात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार शिल्पा बोबडे, मंडळ अधिकारी राजाभाऊ ठाकरे, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, दीपक भोंगाडे, प्रदीप बंडसह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आ. कडू यांनी नुकसानाच्या पंचनाम्याबाबत तहसीलदार बोबडे यांना सूचना केल्या.
दर्यापुरात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
दर्यापूर तालुक्यात नायगाव येथे अवकाळी पावसादरम्यान वीज अंगावर कोसळल्याने गंगाधर आत्माराम कोकाटे (७६) या शेतकºयाच्या मृत्यू झाला. ते शेतातील हरभऱ्याच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी नायब तहसीलदारल देशपांडे व मंडळ कृषी अधिकारी पागृत यांनी भेट दिली.
वरूडमध्ये आठ जनावरे दगावली
वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाई शिवारात चरण्यास सोडलेली नामदेव फुसे, राजेश सोमकुंवर, परसराम गजाम, सावबाई आहाके, सीताबाई ढबाले, गणपत मसराम, प्रफुल्ल सोमकुंवर यांच्या मालकीच्या सहा गायी आणि वासरू १० वाजताच्या सुमारास वीज कोसळून दगावले. शिंगोरी शिवारात जिवंत विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने बैल जागीच ठार झाला. वरूड-राजुरा बाजार राज्य मार्गावर अमडापूरलगत झाड कोसळल्याने वाहतूक एक तास ठप्प होती.
अवकाळीमुळे शेतकरी चिंतेत
यंदा डिसेंबर व जानेवारीमध्ये बऱ्यापैकी थंडी राहिल्याने रब्बी हंगामातील पिके जोमाने बहरली. रविवारपर्यंत पीक परिस्थितीही समाधानकारक होती. तथापि, ‘लोकमत’ने ८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या अवकाळीच्या भाकिताने शेतकºयांची चिंता वाढविली होती. ्जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पहाटेच्या सुमारासच गारपीट झाली. त्याचा पिकांना तडाखा बसल्याने त्यांच्या आर्थिक नुकसानात भर पडली आहे. शेतात कापून ठेवलेल्या रबी हरभऱ्याचे पीक गारपिटीत सापडले आहे. गव्हाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वातावरणात अचानक गारठा वाढल्याने नुकसानाची टक्केवारी मोठी राहणार आहे.
गारपीट, पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यानी विमा काढला, त्या विमा कंपन्यांसोबत तातडीने बैठक घेतली जाईल. मात्र, ज्यांनी विमा काढले नाहीत, अशा शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविली जाईल.
- अभिजित बांगर,
जिल्हाधिकारी, अमरावती.
१४ पर्यंत अवकाळी, गारपिटीची शक्यता कायम
अमरावती : जिल्ह्याला आणखी तीन दिवस पाऊस व गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. १४ फेबु्रवारीनंतर हळूहळू तापमान वाढेल. मात्र, महिन्याभरात किमान तापमान १४ ते १५ डिग्री सेल्सीअस राहील. त्यानंतर मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा सुरू होणार आहे.