जिल्ह्याला गारपीट, वादळाचा तडाखा

By admin | Published: May 6, 2016 12:04 AM2016-05-06T00:04:06+5:302016-05-06T00:04:06+5:30

गुरूवारी दुपारी ४ वाजतानंतर शहरासह जिल्हाभरात वादळी पावसासह गारपीट झाली. यामुळे उन्हाची दाहकता कमी झाली असली तरी विविध तालुक्यात या पावसामुळे शेतीपिकांची मोठी हानी झाली.

Hailstorm in the district, storm hits | जिल्ह्याला गारपीट, वादळाचा तडाखा

जिल्ह्याला गारपीट, वादळाचा तडाखा

Next

संत्रा, कांद्याचे प्रचंड नुकसान : झाडे उन्मळली, टिनपत्रे उडाली, वीजपुरवठा खंडित
अमरावती : गुरूवारी दुपारी ४ वाजतानंतर शहरासह जिल्हाभरात वादळी पावसासह गारपीट झाली. यामुळे उन्हाची दाहकता कमी झाली असली तरी विविध तालुक्यात या पावसामुळे शेतीपिकांची मोठी हानी झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये वादळ-वाऱ्यासह पाऊस बरसला. बहुतांश तालुक्यांमध्ये कांद्यासह इतर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या आंबिया बहाराला देखील वादळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. काही ठिकाणी वृक्ष कोलमडले तर घरांवरील टिनपत्रे वाहून गेले. चिखलदरा, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर-परतवाडयासह जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये गारपिटीचे वृत्त आहे. बोर ते आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्यात.
बडनेरा व परतवाडा येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी बडनेरा शहरात पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे अमरावती शहरात वित्त अथवा प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रचंड उष्म्यापासून या पावसामुळे दिलासा मिळाल्याने शहरात सायंकाळी उत्साहवर्धक वातावरण होते.

टिनपत्रे उडाल्याने
अनेकांचे संसार उघड्यावर

अमरावती शहर : शहरासह तालुक्यात सांयकाळी ४.३० वाजता अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार सुरूवात केली. यामुळे ग्रामीण व शहरात कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
तिवसा : तालुक्यात दुपारी ४ वाजल्यापासून वादळवाऱ्यासह दोन तास पावेतो अवकाळी पाऊस पडला. तालुक्यातील सर्वच गावामध्ये या वादळाने मोठयाप्रमाणात नुकसान झाले. तिवसा शहरात महामार्गावरील दुभाजकावर असलेला हायमस्टलॅम्पचा पोल पडला, अनेक घरांची टीनपत्रे उडाल्याने जीवनावश्यक वस्तू भिजल्या. तिवसा ते रिध्दपूर या राज्यमहामार्गावर अनेक वृक्ष कोसळले व फाद्या तुटू पडल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युततारा तुटल्याने विज पुरवठा खंडीत झाला. या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वादळाने संत्र्याच्या फांद्या तुटल्या व आंबिया बहाराची फळे तुटून पडली. गव्हाची मळणी नुकतीच झाल्याने अनेक शेतात गंजी असलेले कुटार ओले झाले. वृत्त लिहीस्तोवर तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडीत आहे.
चांदूररेल्वे : तालुक्यात सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास पावसाला सुरुवात झाली. १५ मिनिटे पावेतो तुरळक पाऊस पडला या पावसाने नागरिकांची तांराबळ उडाली असली तरी कुठेही नुकसान झालेले नाही.
धामणगाव रेल्वे : तालुक्यात सायंकाळी ५ च्या सुमारास वादळासह १० ते १५ मिनिटे पावेतो पाऊस पडला. या पावसामुळे थंडावा निर्माण झाला.
चिखलदरा : तालुक्यात दुपारी २ चे सुमारास वादळासह गारपीट झाली. काटकुंभ येथील आठवडी बाजार असल्याने बाजाराला आलेल्या आदिवासीची व दुकानदारांची तारांबळ उडाली. या तालुक्यात काटकुंभ, चूरणी, परिसरातील जरिदा, डोमा, काजलडोह, तोरणवाडी, कोयलारी, पाचडोंगरी, बामादेही, कन्हेरी, गागरखेडा, कोटमदंहेडी आदी गावामध्ये १५ ते २० मिनीटे पावेतो बोरा ऐवढी गारपीट झाली.
वलगाव : परिसरात मुसळधार पाऊस झाला तर वायगाव येथे बोराच्या आकाराचे गारपीट झाली. अचानक अवकाळी पावसाने परिसर झोडपून काढला. आष्टी व टाकरखेडा परिसरातही धो-धो पाऊस कोसळला या भागात विजेच्या कळकटासह वादळी पाऊस झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. तर भातकुलीतही वादळी पाऊस झाला. या ठिकाणी भातकुलीत तुरीएवढी गार एक मिनिटापर्यंत पडली.
दर्यापूर : दर्यापूर तालुकयात वादळी पावसासह गारपीट झाली. दुपारी ५.३० वाजता अचानक वाऱ्यासह अकाली पाऊस झाला. चंडीकापूर शिंगणापूर, आराळा, बोराळा, जसापूर येथे २ते ३ मिनाटा पर्यंत बोराएवढी गारपीट झाली. दर्यापूर शहरासह तालुकयात अनेक ठिकांनी वादळी पावसाने झोडपले. दर्यापूर तालुका हा खारपाणपटटा असल्यामुळे येथे पिकांचे मोठे नुकसान झाले नाही. मुसळधार पावसामुळे नागरिक मात्र काही वेळे पूरते भयभीत झाले होते.
नांदगाव खंडेश्वर : गुरुवारी जिल्हयात झालेल्या वादळीे पावसासह गारपीट झाली नांदगाव खंडेश्वर येथे दुपारी ५.४५ वाजता विजेच्या कडकडासह वादळी पाऊस झाला या दरम्यान नांदगाव शहरात बोराच्या आकाराची २ मिनिट गारपीट झाली. सध्या शेतकऱ्यांच्या कांदा हे पिक काढणे सुरु आहे. कांदेयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक महिती आहे. तसेच आंबियाचा संत्र्याचा बार आला आहे. तो गळून पडला. तसेच लिंबू या पिकांचे नुकसान झाल्याची महिती आहे. वाघोली, कोदोरी, धानोरा गुरव येथे तुरीएवढी गार पडली. तर पुसनेर, पापळ, वाढोणा, पहुर येथे वादळी पाऊस झाला.
मोर्शी : शहरासह ग्रामीण भागात दुपारी ४ वाजताचे सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली . यात तालुक्यात गारपिटीने कांदा, संत्र्याचा आंबिया बहाराचे गळती मोठया प्रमाणात झाली आहे. याशिवाय भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याची माहिती. अचानकच पावसाने हजेरी लावून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडी आलेले पिक हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. मोर्शी तालुक्यात लेहगांव परीसरात लिंबुच्या आकाराच्या गारा पडल्याने संत्रा, मोसंबी, निबू, डाळींबाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. सोबतच सावरखेड, पिेंगळाई, रिध्दपुर याही गावामध्ये गारा पडल्याने शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
वरुड : तालुक्यात सांयकाळी साडेचार वाजताचे सुमारास वादळी वारा सुरू झाला. अशातच ढगाळ वातावरण होते. मात्र सांयकाळी उशिरा पर्यत पावसाने हजेरी लावली नाही.
धारणी : तालुक्यातील हरीसाल, नांदुरी, कारा या ठिकाणी सांयकाळी चार ते पाच वाजताचे सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्यात मात्र धारणी शहरात ढगाळ वातावरण व वादळी वारा जोरात होता. परंतु पावसाने मात्र हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नाही.
परतवाडा : गुरूवारी सांयकाळी ४ वाजता पासून तालुक्यातील रासेगाव, चौसाळा, येवता,नायगाव, बळेगाव, बोपापूर, इसेगाव आदी परीसरात तुरळक गारपिटीसह पाऊस बरसला विजाचा कडकङाट देखील झाला.प्रत्यक्ष अचलपूर, परतवाडा शहरात पावसाचा शिरवा झाल्याने वातावरणात आल्हाददायक बदल जाणवला.
चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. वादळ सुटले होते. परंतु कुठलीही हाणी यात झाली नाही.
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातही गुरुवारी अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. यामुळे नागरिकांना उखाळ्यापासून थोडी सुटका मिळाली आहे. मात्र नुकसान झाले नाही. मात्र वादळी वारा व ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी अंजनगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आल्हाद दायक वातावरण पसरल्याने शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Hailstorm in the district, storm hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.