४० दिवसात सहा वेळा गारपिटचा मार, पाच हजार हेक्टर बाधित
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 26, 2023 03:54 PM2023-04-26T15:54:20+5:302023-04-26T15:56:53+5:30
सात कोटींच्या शासन मदतनिधीची मागणी
अमरावती : जिल्ह्यात १८ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत तब्बल सहावेळा विजा, वादळासह अवकाळी व गारपिटीने जिल्ह्यास दणका दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. या आपत्तीमुळे पाच हजार शेतकऱ्यांच्या चार हजार हेक्टरमधील रबी, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
खरिपाचा हंगाम अतिपावसाने वाया गेल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर होती व गहू, हरभरा, कांदा पिके काढणीला असतांनाच १६ मार्चपासून जिल्ह्यात अवकाळीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये विजांसह वादळही असल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यात दोन व्यक्तींसह १५ वर गुरांचा वीज पडल्याने मृत्यू झालेला आहे. याशिवाय एक हजारांवर घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत.
सर्वाधिक नुकसान काढणीला आलेल्या गहू पिकाचे झाले आहे. वादळामुळे गहू आडवा झाला व पावसात भिजला. याशिवाय कांद्याला पाणी लागल्याने तो जास्त दिवस साठवणूक करता येत नाही. संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ झाली. केळीचेही वादळाने नुकसान झालेले आहे. क्षेत्रिय यंत्रणांनी ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन साधारणपणे सात कोटींच्या मदत निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केलेली आहे.