विदर्भातील उत्तर भागात गारपीट? हवामानतज्ज्ञांचा अंदाज, दक्षिण भारतात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 05:40 PM2018-02-06T17:40:31+5:302018-02-06T17:41:08+5:30
हिवाळा संपला; आता काही दिवसांत कडक उन्हाच्या झळा वैदर्भीयांना सोसाव्या लागतील. मात्र, त्यापूर्वी येत्या ११ फेबु्रवारीपर्यंत वातावरणात बदल घडून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमरावती : हिवाळा संपला; आता काही दिवसांत कडक उन्हाच्या झळा वैदर्भीयांना सोसाव्या लागतील. मात्र, त्यापूर्वी येत्या ११ फेबु्रवारीपर्यंत वातावरणात बदल घडून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विदर्भाच्या उत्तर भागात हलक्या पावसासह गारपीट होणार असल्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.
हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी केलेल्या भाकितानुसार, हिमालयाच्या उत्तर भागात पश्चिमी चक्रवात सक्रिय असून, पंजाब व हिमालयीन पश्चिम बंगालवर चक्राकार वारे वाहत आहेत. कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, तेथेही चक्राकार वारे वाहत आहेत. नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय आहेत. हिमालयाकडून येणारे थंड वारे तसेच पूर्वेकडील बाष्पयुक्त वारे यांच्या संयुगाने उत्तर भारतातील थंडीची लाट लोप पावली आहे. त्या अनुषंगाने रात्रीचे तापमान २ ते ३ अंश सेल्सीअसने वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात बाष्पाचा पुरवठा वाढल्याने महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे मंगळवारपासून दक्षिण भारतात पावसाची शक्यता असून, किमान तापमानात वाढ होणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागात ७ फेब्रुवारी रोजी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी पाऊस पडेल. ८ व ९ फेब्रुवारी रोजी किमान तापमान १५ ते १६ डिग्री, तर कमाल तापमान ३३ ते ३५ डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवसांत उन्हाचा प्रभाव अधिक जाणवेल, तर किंचित ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना थोडा दिलासाही मिळणार आहे. १० फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस, तर ११ फेब्रुवारी रोजी विदर्भाच्या उत्तर भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरुपात पाऊसही राहण्याचे संकेत बंड यांनी दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी पावसाचे वातावरण निर्माण होते. यंदा तर गारपिटची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
या ठिकाणी गारपिटीची शक्यता
पूर्व मध्य प्रदेश, सातपुड्याचा पायथा, परतवाड्याचा वरचा भाग, मोर्शी, वरुड, काटोल, गोंदिया या भागांमध्ये तुरळक पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.