टाकरखेडा, देवरी, आष्टी येथे गारपीट
By admin | Published: May 11, 2016 12:36 AM2016-05-11T00:36:34+5:302016-05-11T00:36:34+5:30
टाकरखेडा संभूसह नजीकच्या देवरी निपानी व आष्टी येथे सोमवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने सुरुवात केली.
घरावरचे छत उडाले : आष्टी मार्गावरील वाहतूक ठप्प
भातकुली/टाकरखेडा संभू : टाकरखेडा संभूसह नजीकच्या देवरी निपानी व आष्टी येथे सोमवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने सुरुवात केली. क्षणातच शेकडो घरांचे छत उडाले. टाकरखेडा, साऊर, टाकरखेडा-आष्टी, आष्टी ते वायगाव मार्गावर वाहतूक एक तास ठप्प झाली होती. याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले.
सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता वादळी पावसासह गारपिटीला सुरुवात झाली. या वादळी पावसामुळे टाकरखेडा संभू येथील निर्मला रमेश कांडलकर, गणोरकर, गेडाम, भालचंद्र यांच्या घरावर झाड कोलमडून पडल्याने त्यांची घरे जमीनदोस्त झाली आहे. त्याचबरोबर प्रभाकर लाडे, मेहरे यांच्यासह गावातील अनेक घरांवरचे छत उडाले आहेत. याचबरोबर विजेचे खांबदेखील कोलमडून पडल्याने सोमवारपासून या तीनही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. यातील अनेक घरांवर विजेचे खांबदेखील कोलमडून पडले. साऊर मार्गावरील गजानन महाराज मंदिरातील छत उडाले. भिंतीदेखील कोलमडून पडल्या. साऊर मार्गावरील गजानन महाराज मंदिरावरील छत उडाले, तर भिंतीदेखील पडल्या. मुस्तफा यांच्या पोल्ट्री फार्मनजीकच्या कांद्याचे गोदाम उडाल्याने त्यांच्या ४० किलो कांद्याचे नुकसान झाले आहे. याचबरोबर देवरी निपानी येथे घराची छते उडाली.
यामधील गजानन ठाकरे, संगीता अजय पवार, रमाबाई जानराव इंगळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरपंच, उपसरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधींनी गावातील नुकसानाची पाहणी केली. (वार्ताहर)