अमरावतीत तीन तालुक्यांत गारपीट; यशोमती ठाकूरांकडून सर्वेक्षणाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:24 PM2020-01-02T20:24:17+5:302020-01-02T20:24:28+5:30
धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली.
अमरावती : जिल्ह्यातील धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली. या गारपिटीमुळे या तीन तालुक्यांत खरीप-रबी पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. यात तिवसा २७.६, मोर्शी २३.८, चिखलदरा २६.९ तर वरूड तालुक्यात सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली. या अवकाळी पावसाने कपाशी, तूर, संत्रा, केळी व रबीतील गव्हाचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयानुसार, मोर्शी तालुक्यातील ५९ गावांमधील ४५१३ हेक्टरवरील संत्रा, वरुड तालुक्यातील १४० गावांमधील १० हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा व कपाशी बाधित झाली.
तिवसा तालुक्यातील १७ गावांमधील ३३२० हेक्टरवरील संत्रा, गहू, तूर, चना, कांदा पीक बाधित झाले. तर चांदूर बाजार तालुक्यातील दोन गावांमधील ४६५ हेक्टर क्षेत्रावरील तूर व हरभरा बाधित झाला. एकंदरीत परतीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना सलग दोन दिवसांतील अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतक-यांवर संकट कोसळले आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याचे आदेश महसूल यंत्रणेस दिले आहेत.