अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, पिके मातीमोल; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४.५८ कोटींची भरपाई
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 11, 2023 04:49 PM2023-04-11T16:49:44+5:302023-04-11T16:54:11+5:30
पश्चिम विदर्भात १४,५०० हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला, फळपिके बाधित
अमरावती : मार्च महिन्यात दोन वेळा वादळासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये पश्चिम विदर्भातील २६,१३२ शेतकऱ्यांच्या १४,४५९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २४.५८ कोटींचा निधी शासनाने सोमवारी मंजूर केला. शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या शासन मदतीमध्ये २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार सुधारणा केलेली आहे व या वाढीव दरानुसार आता बाधित पिकांसाठी मदत देण्यात येणार आहे.
पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांत मार्च महिन्यात तीन वेळा गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ३१ मार्चला झालेल्या आपत्तीचे पंचनामे एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी दोन वेळा आपत्तीने नुकसान झाले. त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता जिल्हास्तरावर पंचनामे पूर्ण झाल्यावर ३३ टक्क्यांवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत व याद्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर त्या खात्यामध्ये शासनस्तरावरून निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.
जिल्हानिहाय मंजूर निधी
अमरावती जिल्ह्यातील बाधित १३७० हेक्टरसाठी २.३८ कोटी, अकोला जिल्ह्यातील २५९३ हेक्टरसाठी ४.४९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ४,०२६ हेक्टरसाठी ६.९१ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ४८२३ हेक्टरसाठी ७.९२ कोटी व वाशिम जिल्ह्यात १६४४ हेक्टरसाठी २.८६ कोटी रुपये शासनस्तरावर मंजूर करण्यात आले आहे.
सततच्या पावसाच्या नुकसानीची व्याख्या करण्यात येऊन आपत्तीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अवकाळीसह गारपिटीने बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना शासन मदत देण्यात येत आहे, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.