दहिगाव परिसरात गारपिटीने कोट्यवधींची हानी
By admin | Published: October 11, 2014 01:04 AM2014-10-11T01:04:32+5:302014-10-11T01:04:32+5:30
तालुक्यातील दहीगाव पूर्णा येथे सोमवारी झालेल्या गारपीट मुळे कपाशी, संत्रा, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे.
चांदूरबाजार : तालुक्यातील दहीगाव पूर्णा येथे सोमवारी झालेल्या गारपीट मुळे कपाशी, संत्रा, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे.
सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावली. दहीगाव पूर्णा, लसनापूर, कृष्णापूर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली यामध्ये दहीगाव पूर्णा येथील संत्रा पिकाचे नुकसान झाले. या भागात संत्रा, कपाशी, सोयाबीन या पिकांच्या पेरा अधिक असून या शेतकऱ्यांचा शेती व्यतिरिक्त कोणताच जोडधंदा नसल्याने परिसरातील शेतकरी हा पूर्णत: शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सुलतानी संकटासह आस्मानी संकटाला सुध्दा सामोरे जावे लागते.
दहीगाव, कृष्णापूर भागात झालेल्या गारपिटीने परिसरातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात गारांचा सळा शिंपल्यागत यामुळे संत्राची सर्वाधिक गळती झाली तर सुसाट वाऱ्याने सोयाबीन, कपाशी ही पिके झोपून गेली आहे. या भागात कोट्यवधींचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना शासनाने मदत करावी, या अनुषंगाने शेकडो शेतकरी तहसील कार्यालयात पोहचले होते.
दहीगाव येथील रवीन्द्र वैद्य यांचा संत्रा बगीचा ३ लाख रुपयाला व्यापाऱ्यांनी मागितला होता. मात्र अवघ्या २४ तासांतच काळाने घात केला व गारपिटीमुळे संपूर्ण संत्रा गळून पडला. पूर्वीच कर्जाचे डोंगर, त्यावर आता वर्षभर स्वत:ची उपजीविका कशी चालवावी, असा गंभीर प्रश्न वैद्य यांचा पुढे उभा ठाकला आहे.
पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी सुरेश पाटील, आशीष वैद्य, गौरव वैद्य, शंतनू पुसतकर, महेश वैद्य, विनायक चौधरी, प्रतीक काळे, नारायण वैद्य, अतुल वैद्य, पवन निंघोट, प्रभाकर वैद्य, प्रल्हाद वैद्य यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.