बहादूरपूर, टभ्ब्रुसोडा शिवारात सोयाबीन पिकावर केसाळ अळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:17+5:302021-07-03T04:09:17+5:30
पान २ चे लिड चिखलदरा : तालुक्यातील बहाद्दरपूर व टेंब्रुसोडा शिवारात सोयाबीन पिकावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव आठवडाभरापासून दिसून ...
पान २ चे लिड
चिखलदरा : तालुक्यातील बहाद्दरपूर व टेंब्रुसोडा शिवारात सोयाबीन पिकावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव आठवडाभरापासून दिसून येत आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी औषध फवारणीची सूचना कृषी विभागाने केली आहे.
ही कीड डोंगराळ व वनक्षेत्राजवळील पिकांत प्रथम आक्रमण करते. नंतर इतर ठिकाणी पसरते. ही बहुभक्षी कीड असून, पूर्ण वाढलेली अळी ४० ते ४५ मिमी लांब असते. तिची दोन्ही टोके काळी व मधला भाग मळकट पिवळा असतो. तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या अधाशी व सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूला राहून त्यातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अळ्या मोठ्या झाल्यावर शेतभर पसरून पाने खाऊन नुकसान करतात. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास त्या झाडांचे खोडच शिल्लक राहते. नंतर त्या दुस-या शेतात जातात.
पेरणी झाली नसेल तर बीजप्रक्रिया करा
ज्या शेतकरी बांधवांची पेरणी व्हावयाची असेल त्यांनी प्रथम सोयाबीन बियाण्याला रासायनिक बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झाम ३० टक्के एफ. एस. १० मिली प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, अशी सूचना प्रादेशिक संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी केली.
बाधित पाने नष्ट करा
ज्या ठिकाणी उगवलेल्या रोपांवर प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्याठिकाणी अंडीपुंज असलेली पाने, तसेच जाळीदार पाने त्यातील असंख्य अळ्यांसह गोळा करून त्याचा रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नाश करावा. प्रार्दुभाव आढळून आलेल्या ठिकाणी ४० ते ५० प्रति हेक्टरी पक्षीथांबे उभारावेत.
कोट
अळी नियंत्रणासाठी सांघिक प्रयत्न केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात व प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सांघिक प्रयत्न करावेत.
- विजय चवाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी