अर्ध्या शतकापासून ‘ते’ रेडिओला म्हणतात, ‘तू माझा सांगाती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:29 PM2018-07-10T22:29:49+5:302018-07-10T22:30:13+5:30
येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.
देवेंद्र धोटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा(शहीद) : येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.
वर्तमानपत्रानंतर भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले. बी.बी.सी.च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्रॉडकास्टिंग कापोर्रेशनच्यावतीने पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीची सुरुवात केली. मात्र, १९२४ साली मद्रास येथून एका खासगी संस्थेने प्रसारणास सुरुवात केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली. कामगार व उद्योग या विभागांतर्गत 'भारतीय राज्य प्रसारण मंडळ' नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे 'आॅल इंडिया रेडिओ' असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा 'आॅल इंडिया रेडिओ' नावाचा स्वतंत्र विभाग माहिती, प्रसारण मंत्रालयांतर्गत स्थापन केला. त्याचे अधिकृतरीत्या 'आकाशवाणी' हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. वर्तमानपत्रानंतर आलेला रेडिओ प्रसार माध्यमाचा जगातील क्रांतिकारी आविष्कार होता.
अण्णा म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या गोपाळरावांनी ४७ वर्षांआधी जेव्हा रेडिओ खरेदी केला, तेव्हा लोकांत कुतूहल होती. नुसता हा बोलता पोपट पाहण्यासाठी अनेक लोकं त्यांच्याकडे यायचे. बातम्या व मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकण्यासाठी रोजच्या गर्दीचे अनेक किस्से अण्णा सांगतात. राष्ट्रीय घडामोडी, देशाच्या निवडणुकांचे निकाल, पाकिस्तानशी युद्वाविषयीच्या बातम्या जेव्हा प्रसारित व्हायच्या, तेव्हा तर ऐकणाºयांची संख्या शेकडोच्या घरात असायची, असे अण्णा सांगतात. इंदिरा गांधींच्या हत्तेची बातमी ऐकायला सतत आठ-दहा दिवस लोकं जमायची, इतकेच नाही तर वार्तांकन सुरू असताना अनेक जणांना अश्रू अनावर व्हायचे, असे कित्येक किस्से अण्णांकडे आहेत.
रेडिओशी नाळ कायम
टेलीव्हिजनच्या शोधाने रेडिओ मागे पडला. आज इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया सर्वाधिक लोकांची पसंती असल्याने रेडिओ कालबाह्य झाले असताना वयाच्या ९३ व्या वर्षीही त्यांना वाचन करण्यासाठी चष्म्याची गरज भासत नाही, हे विशेष. घरी सर्वच साधने असली तरीही गोपाळरावांनी मात्र रेडिओशी आपली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे अण्णा आपल्या जुन्या मित्राला बेइमान झालेले नाहीत.