तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रवेश आले निम्म्यावर
By Admin | Published: July 17, 2017 12:08 AM2017-07-17T00:08:10+5:302017-07-17T00:08:10+5:30
राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणात कार्यरत तंत्रनिकेतन महाविद्यालये प्रवेशाअभावी ओस पडू लागली आहेत.
विद्यार्थ्यांना ओहोटी : महाविद्यालये पडताहेत ओस
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणात कार्यरत तंत्रनिकेतन महाविद्यालये प्रवेशाअभावी ओस पडू लागली आहेत. यंदा अमरावती विभागात तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशाची नोंदणी निम्म्यावर आल्याने भविष्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रम बंद पडण्याची भीती वर्तविली जात आहे.
तंत्रशिक्षण मंडळाच्या नवीन नियमांमुळे आयटीआय, एमसीव्हीसी, बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेता येतो. मात्र तंत्रनिकेतन प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी अल्प असल्याने तंत्रशिक्षण विभागही चक्रावून गेला आहे.
अमरावती विभागात तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची ३१ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी ९ हजार २१० इतकी प्रवेशक्षमता आहे. मात्र १० जुलैपर्यंत तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशासाठी ४ हजार २४० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात करियर घडवू इच्छिणाऱ्यांची संख्या रोडावत चालल्याचे हे द्योतक आहे.
अभियांत्रिकी प्रवेशाची स्थितीदेखील फारशी वेगळी नाही. काही संस्थाचालकांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी अक्षरश: विद्यार्थी शोधून आणावे लागत आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरी काही अभियांत्रिकी महाविद्यालयांचे रेकॉर्ड बघूनच पालक त्यांच्या पाल्यांना प्रवेश देत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रवेशासाठी रांगा लागायच्या. मात्र, आता चित्र बदलले असून तंत्रनिकेतन महाविद्यालये प्रवेशाअभावी ओस पडू लागली आहेत.