अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत

By admin | Published: September 10, 2015 12:03 AM2015-09-10T00:03:12+5:302015-09-10T00:03:12+5:30

साहिल डायरे या चिमुरड्याच्या मृत्यूनंतर माहुली (जहांगिर) येथे निर्माण झालेल्या स्थितीनंतर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईच्या धसक्यामुळे अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत झाले आहेत.

Half of the Mahuliyevi underground | अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत

अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत

Next

अमरावती : साहिल डायरे या चिमुरड्याच्या मृत्यूनंतर माहुली (जहांगिर) येथे निर्माण झालेल्या स्थितीनंतर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईच्या धसक्यामुळे अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत झाले आहेत. गावात उरलेल्या काही मोजक्या गावकऱ्यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली असून आणखी काही गावकऱ्यांना अटक करण्यात येणार आहे. माहुली येथे २५ आॅगस्ट रोजी साहिल गजानन डायरे या चिमुकल्याचा एसटी खाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी एसटीसह एका अग्निशमन दलाच्या वाहनाची जाळपोळ केली. तर पोलिसांनाही मारहाण केली. जाळपोळीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करून गावकऱ्यांवर छऱ्याच्या बंदुकी चालविल्या. घटनेच्या तब्बल १४ दिवसांनंतर पोलिसांनी सोमवारपासून दोषी गावकऱ्यांना अटक करणे सुरु केले आहे. जाळपोळ व लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी रवी पेठेकर, योगेश यावस्कर, मार्कंड सुरडकर, छत्रपती गणपत सपकाळ यांना अटक केली आहे.
माहुलीत स्मशान शांतता
अमरावती : माहुली पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्याप्रकरणी पोलिसांनी उपसंरपच अब्दुल अन्सार अब्दुल जब्बार व शिरीष टवलारे यांना अटक केली आहे. त्यापैकी रवी, योगेश, मार्कंड व छत्रपती यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तर उपसंरपंच अब्दुल अन्सार व शिरीष टवलारे यांना जामीन मंजूर केला आहे. माहुली पोलीस ठाण्यावर मोर्चा नेणाऱ्यांपैकी गजानन भोनेला ८ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली असून त्याला जामीन मिळाला आहे. पोलिसांनी अटकेची मोहीम सुरु केल्याने सर्वच गावकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. त्यामुळे दोषी गावकऱ्यांसह अर्धेअधिक गावकरी गाव सोडून गेले आहेत. परिणामी माहुली येथे स्मशानशांतता पसरली आहे.
निरपराधांवर पोलिसांचा अन्याय
गावातील तणाव शांत करण्याकरिता गेलेले सरपंच संजय नागोसे व प्रवीण मनोहरे यांच्यावर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सरपंच सकाळी ८.५१ वाजताच्या सुमारास टोलनाक्यावर असल्याची नोंद आहे. मात्र, पोलिसांनी सकाळी ७ वाजता घडलेल्या घटनेमध्ये सरपंचावर गंभीर गुन्हे नोंदविले. हा त्यांच्यावर अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Half of the Mahuliyevi underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.