Amravati: हाफ मॅरेथॉन: धावले अंबानगरीकर..., वेळेच्या अचुक नोंदीसाठी चिपचा वापर
By गणेश वासनिक | Published: October 8, 2023 03:49 PM2023-10-08T15:49:57+5:302023-10-08T15:50:34+5:30
Amravati: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य पुन्हा सक्षम व्हावे व प्रत्येक व्यक्तीला निरामय आरोग्य जगता यावे, याकरिता अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २३०० पेक्षा अधिक धावकांनी सहभाग घेतला होता.
- गणेश वासनिक
अमरावती - आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य पुन्हा सक्षम व्हावे व प्रत्येक व्यक्तीला निरामय आरोग्य जगता यावे, याकरिता अमरावतीमॅरेथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २३०० पेक्षा अधिक धावकांनी सहभाग घेतला होता. धावकांच्या उत्स्फूर्त सहभागाने या स्पर्धेला आणखीच रंगत आली.
लहान चिमुकल्यांचा किलबिल, तरुणांचा उत्साहपूर्ण जोश आणि वरिष्ठांच्या सहभागामुळे अतिशय उत्कंठापूर्वक वातावरणात ही हाफ मॅरेथॉन संपन्न झाली. २१ कि.मी. अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर ६.०० वाजताच सुरु झाली. आमदार सुलभा खोडके, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, महापालिका आयुक्त देविदास पवार, क्रीडा उपसंचालक विजय संतान आदींनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. २१ कि.मी. ही हाफ मॅरेथॉन जवाहरलाल नेहरु स्टेडीयम येथून सुरु झाली. या स्पर्धेचा मार्ग जिल्हा स्टेडियम, पंचवटी चौक, वेलकम पाईंट, बियाणी चौक, नेताजी कॉलनी-मार्डी रोड परत विद्यापीठ परिसर, बियाणी चौक, वेलकम पॉईंट, बियाणी चौक, इर्वीन चौक, राजकमल उडाणपूल, राजापेठ पोलिस स्टेशन पासून परत राजकमल उड्डाण पुल, इर्वीन चौक ते जिल्हा स्टेडीयम असा होता.
१० कि.मी. पावर रन सकाळी ६.१५ वाजता लहान मुलांचा ५ कि.मी. व ५ किमी फीटनेस चॅलेंज ही स्पर्धा ६.३० वाजता सुरु झाली. स्पर्धेअंती सर्व गटातील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज व रोख बक्षीस देण्याकरीता बक्षीस वितरण समारंभ सकाळी ९.३० वाजता आयोजीत करण्यात आला होता. एकूण ३.२५ लक्ष रुपयाचे रोख बक्षीस सर्व विजेत्यांना देण्यात आले.
कार्यक्रमच संचालन व आभार ममेश माथनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिलीप पाटील, डॉ अतुल पाटील, डॉ सुभाष गावंडे, किशोर वाठ, मुकुंद वानख, सतीश दवंडे गजानन धर्माळे, नरेंद्र पंचारिया, राहुल पाटील, संध्या पाटील, अपूर्वा गोळे आदींनी सहकार्य केले.
वेळेच्या अचुक नोंदीसाठी चिपचा वापर
२१ कि.मी. व १० किमी मधील स्पर्धकांची अचुक वेळ नोंदविण्याकरीता व इलेक्ट्रॉनीक टायमींग चिपचा वापर करण्यात आला. याकरिता स्पर्धेच्या सुरवातीला मार्डी रोडवर नेताजी कॉलनी जवळ व राजापेठ पोलिस स्टेशन जवळ इलेक्ट्रॉनीक सेन्सर स्थानक उभारण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धक या चारही ठिकाणावरुन गेला किंवा नाही याची खातरजमा याव्दारे करण्यात आली.