काँग्रेसचे अर्धदफन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:49 PM2018-10-13T22:49:09+5:302018-10-13T22:49:25+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम गतवर्षीच पूर्ण झाले; श्रेयवादाच्या राजकारणात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने अर्धदफन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा (शहीद) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम गतवर्षीच पूर्ण झाले; श्रेयवादाच्या राजकारणात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने अर्धदफन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
वरुड तालुक्यात गतकाळात अनेकदा साथरोगांनी थैमान घातले. मेळघाटनंतर वरुड तालुका आरोग्य विभागासाठी संवेदनशील क्षेत्र म्हणून परिचित आहे. बेनोडा गावातही डायरियाने एकाचा मृत्यू झाला. .ा पार्श्वभूमीवर बेनोडा आणि परिसरातील ३५ हजार नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी बेनोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली. मात्र, अद्यापही श्रेयवादाच्या भोवऱ्यात या केंद्राचे उद्घाटन झालेले नसल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे जिल्हा आरोग्य अधिकाºयांना अनेकदा निवेदने देण्यात आली. त्यांनी १ आॅक्टोबरपूर्वी कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अद्याप न झाल्याने काँग्रेसने रविवारी अर्धदफन आंदोलन केले.
आंदोलनात मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज इंगोले, जिल्हा परिषद सर्कलप्रमुख मनोज गेडाम यांनी सहभाग घेतला. तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी भेट देऊन लेखी स्वरूपात एक महिन्यात केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे कळविले आहे. आश्वासनपूर्ती न झाल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला.
अर्धदफन आंदोलनात वरूड पंचायत समिती सभापती तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विक्रम ठाकरे, वरूड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल चौधरी, वरूड नगर परिषदेचे नगरसेवक धनंजय बोकडे, मनोज ठाकरे, राहुल नागपूरे, तुषार घोंगडे, प्रफुल जिचकार, रुपेश चोरे, रोषण कुबडे, रोषण लाड, अमोल सालबर्डे, विनायक नांदूरकर यांच्यासह बेनोडा परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.