कॉम्प्युटर आॅपरेटर्समध्ये निम्मी कपात
By admin | Published: February 4, 2017 12:10 AM2017-02-04T00:10:24+5:302017-02-04T00:10:24+5:30
महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या वाजवीपेक्षा अधिक कंत्राटी कॉम्प्युटर आॅपरेटर्सची कपात करण्यात येणार आहे.
आस्थापना खर्चात बचतीची भूमिका : संगणक कर्मचाऱ्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह
अमरावती : महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या वाजवीपेक्षा अधिक कंत्राटी कॉम्प्युटर आॅपरेटर्सची कपात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७० पैकी ३५ जणांना कामावरून कमी करण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आॅपरेटर्सची छाननी केली जाईल. अनावश्यक ठिकाणचे कंत्राटी कर्मचारी कमी करण्यासोबतच आस्थापना खर्चात बचत करण्याची भूमिका ठेवून आयुक्तांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कपातीचे पाऊल उचलले आहे.
तत्कालीन आयुक्तांच्या कार्यालयात एका खासगी कंत्राटी एजन्सीकडून महापालिकेने कॉम्प्युटर आॅपरेटर्सची सेवा घेतली आहे. मूळ करारनामा अल्पसंख्येचा असताना त्या संस्थेत वेळोवेळी भर घालण्यात आली. तूर्तास महापालिकेच्या विविध विभागांत ७० कॉम्प्युटर आॅपरेटर्स आहेत. दादा आणि भाऊंच्या दबावापोटी विनाकारण ही संख्या फुगविली गेली. वास्तविक पाहता इतक्या मोठ्या संख्येत कॉम्प्युटर आॅपरेटर कार्यरत असतील तर संबंधित विभागातील कनिष्ठ किंवा वरिष्ठ लिपिकांना संगणकाचे ज्ञान नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. कर्मचाऱ्यांच्या संगणकीय ज्ञानाचा भाग वगळला तरीही कंत्राटी तत्त्वावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची काही ठिकाणे सेवा आवश्यक नसतानाही ते कार्यरत आहेत. तसे निरीक्षण दस्तुरखुद्द आयुक्तांनी नोंदविले आहे. अनावश्यक ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याने मनपाच्या आस्थापनाखर्चात अवाजवी वाढ होत आहे. त्याअनुषंगाने सर्व घटकप्रमुखांनी त्यांच्या विभागात कार्यरत असलेल्या कॉम्प्युटर आॅपरेटर, सुरक्षारक्षक व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वात पहिली कारवाई कॉम्प्युटर आॅपरेटर्सवर होणार आहे. त्यांची संख्या निम्म्याने कपात करण्यात येईल. तसे निर्देश उपायुक्त विनायक औगड यांना देण्यात आले आहेत.
कंत्राटीबाबत आज बैठक
सुरक्षारक्षक, कॉम्प्युटर आॅपरेटर्स व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची आवश्यकता याबाबतच आढावा शनिवारी आयुक्तांकडून घेतला जाणार आहे. ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रपत्रातील माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
अन्यथा विभागप्रमुखांच्या वेतनातून कपात
४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रभागातील माहिती व तपशिलासह उपस्थित राहावे, जेणेकरून अनावश्यक कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणता येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त यापुढे एखाद्या विभागात अनावश्यक कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्यास तो जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर निश्चित करण्यात येईल व अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन संबंधित विभागप्रमुखांच्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे.