आझादनगरात ‘हाफमर्डर’, आरोपींकडून पोलिसांवर दगडफेक
By प्रदीप भाकरे | Published: January 18, 2024 06:34 PM2024-01-18T18:34:25+5:302024-01-18T18:34:53+5:30
पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून तेथील तणावाची स्थिती आटोक्यात आणली. त्यात एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. तर अन्य पळून गेले.
अमरावती: गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगर मैदानात तेथील एका ३७ वर्षीय तरूणाच्या डोक्यावर चाकुने सपासप वार करण्यात आले. त्याला मरणासन्न स्थितीत सोडून आरोपींनी तेथून पळ काढला. १७ जानेवारी रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली. तेथे मोठा हलकल्लोळ माजला असता पोलीस देखील पोहोचले. पोलीस आरोपींना पकडण्यास गेले असता त्यातील एका महिलेसह सहा ते सात जणांनी पोलीस पथकाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांना शिविगाळ देखील करण्यात आली. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून तेथील तणावाची स्थिती आटोक्यात आणली. त्यात एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. तर अन्य पळून गेले.
या हल्ल्यात अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फार (३७, आझादनगर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १८ जानेवारी रोजी सकाळी आरोपी सद्दाम उर्फ इरफान खान, अल्लू मामू, फिरोज लंबा, चिंटू व विकास चढार (सर्व रा. आझादनगर) यांच्याविरूध्द बेकायदशीर जमाव जमविणे, खुनाचा प्रयत्न, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी व फिर्यादी एकाच मोहल्ल्लात राहतात. अ. सत्तार हा त्याच्या नातेवाईकाच्या घराजवळ आझादनगर ग्राऊंडमध्ये उभा असताना आरोपी तेथे आले. त्यांनी सत्तार याच्याकडे पाहून शिविगाळ केली. त्यावर त्याने जाब विचारला असता, सद्दामने त्याच्या डोक्यावर चाकुने वार केला. तसेच विकास व फिरोज यांनी देखील त्याच्या डोक्यावर वार केले. त्यामुळे अ. सत्तार हा रक्तबंबाळ होऊन तेथेच कोसळला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तेथून पळून गेले. सत्तारला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.
घटनेच्या दोन तासानंतर आरोपी पुन्हा घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने व पोलीस अंमलदार सुनिल बाजगिरे हे सहकाऱ्यांसह आझादनगर मैदानात पोहोचले. त्यावेळी रात्रीचे ९.२० वाजले होते. आरोपी हल्ला करून पळून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान आरोपी पुन्हा घटनास्थळावर येऊ शकतात, या शक्यतेपोटी सुनिल बाजगिरे हे तेथे पेट्रोलिंग करत होते. रात्री ११ च्या सुमारास पोलीस जखमीच्या घराजवळ असताना दहा बारा महिला पुरूष तेथे मोठमोठ्याने शिविगाळ करीत आले. पैकी काहींनी ते सद्दाम, इम्रान, विकास हे आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले. ते समजताच बाजगिरे व पोकॉं प्रताप लोखंडे हे त्यांना पकडण्यासाठी धावले. त्यापुर्वी ते पळून जावेत, यासाठी काही आरोपींना पोलिसांसह तेथील उपस्थितांवर दगडफेक केली. त्यांचा पाठलाग करत असताना इम्रानखान पाय अडकून नालीत पडला. त्यावेळी अन्य आरोपींनी पुन्हा दगडफेक केली. त्यामुळे सर्व आरोपी पसार झाले. याप्रकरणी, बाजगिरे यांच्या तक्रारीवरून, सद्दाम, एक महिला, इम्रान खान, फिरोज लंबा, चिंटू व अन्य जणांविरूध्द शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला.